४५ वर्षांवरील नागरिकांची लसीकरणात कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 18:01 IST2021-05-06T18:01:40+5:302021-05-06T18:01:45+5:30
Corona Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील लसीचा साठा त्याच वयोगटासाठी वापरण्याचा अजब फतवा राज्य शासनाने काढला आहे.

४५ वर्षांवरील नागरिकांची लसीकरणात कोंडी
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: लसीच्या तुटवड्यामुळे प्रभावित झालेली लसीकरण मोहिम आता केंद्र आणि राज्य शासनाच्या कचाट्यात सापडल्याचे दिसून येते. १८ ते ४४ वयोगटातील लसीचा साठा त्याच वयोगटासाठी वापरण्याचा अजब फतवा राज्य शासनाने काढला आहे. परिणामी, ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांची लसीकरणासाठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्र राज्यात ४५ आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण गत १५ दिवसांपासून रखडले आहे. लसीचा तुटवडा कायम असतानाच, दुसरीकडे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहिम हाती घेण्यात आलीय. राज्यातील सर्वच या वयोगटातील लसीकरणाला सुरूवात झालेली असतानाच, दुसरीकडे ४५ आणि अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण प्रभावित झाले आहे. अशातच राज्य शासनाने पाठविलेला लसीचा साठा केवळ १८ ते ४५ वयोगटासाठीच वापरला पाहीजे. ४५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटासाठी नाही, असे पत्र अति. संचालक आरोग्य सेवा यांनी संबंधित आरोग्य प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध असल्यानंतरही ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लसीकरणा विनाच परतावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाच्या या पत्रामुळे नजीकच्या काळात राज्य आणि केंद्र शासनामध्ये जुंपण्याची शक्यता असून, लसीकरणाला प्राप्त झालेल्या राजकारणाचा फटका अनेकांना बसत असल्याचे दिसून येते. लसीकरण केंद्रावर वारंवार चकरा मारूनही लस मिळत नसल्याने अनेकांचा मानसिक ताण वाढला आहे.
दुसºया डोससाठी अनेकांची वणवण
- काही केंद्रावर कोवीशील्ड लसीचा साठा उपलब्ध आहे. मात्र, याठिकाणी आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जातेय. तर गत पंधरा दिवसांपासून कोव्हॅक्सीन लसीचा डोस कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे पहिली लस घेऊन ४५ दिवस लोटलेल्यांची लसीकरणासाठी वणवण सुरू आहे. आता अनेक केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध झाली आहे. मात्र, ती लस १८ ते ४४ वयोगटासाठीच वापरण्याचे निर्देश राज्य शासनाने दिलेत. केंद्र आणि राज्याच्या कुरघोडीचा फटका आता अनेकांना बसत आहे.