सिंदखेडराजा तालुक्यात डायरियाची लागण!
By Admin | Updated: July 13, 2016 02:15 IST2016-07-13T02:15:49+5:302016-07-13T02:15:49+5:30
अतिसारांच्या रूग्णात वाढ; आरोग्य केंद्रात औषधसाठा उपलब्ध करून देण्याची मागणी.

सिंदखेडराजा तालुक्यात डायरियाची लागण!
अशोक इंगळे / सिंदखेडराजा (जि. बुलडाणा)
सिंदखेडराजा तालुक्यात ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात डायरियाची लागण झाली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात यावर उपाय म्हणून काहीच सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करावे लागत आहेत. यावर तातडीचा उपाय म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रुग्णांनी केली आहे.
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत साखरखेर्डा, पिंपळगाव सोनारा, गुंज, मोहाडी, गोरेगाव, उमनगाव, शेंदुर्जन, वरोडी, सवडद, शिंदी, राजेगाव, सायाळा, सावंगी भगत ही गावे येतात. या प्रत्येक गावात डायरियाचे रुग्ण आढळून येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्य रुग्ण गेल्यानंतर त्यांच्यावर केवळ गोळ्या देऊन उपचार केले जातात. यावर खरोखर उपचार हवे असतील तर खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला रुग्णांना दिल्या जातो. १५ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत असून, त्यावर ठोस उपाय म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. हा अनुभव प्रत्यक्ष आला आहे. साखरखेर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत असून, ती पूर्णपणे पावसाळ्यात गळते. प्रत्येक खोलीत पाण्याचे डबके साचत असल्याने रुग्णांना भरती करून उपचार करणे कठीण झाले आहे. औषध कक्ष, ऑफिस रुम, बाह्य रुग्ण कक्ष यांसह सर्वच रुममध्ये पाणी साचलेले असते. दररोज ३00 ते ३५0 रुग्ण उपचारासाठी येथे येतात आणि तुटपुंज्या गोळ्यांवर त्यांचे मानसिक समाधान करून परत पाठविले जाते.