शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता संवाद यात्रा!
By Admin | Updated: May 26, 2017 01:35 IST2017-05-26T01:35:27+5:302017-05-26T01:35:27+5:30
कृषी मंत्र्यांनी अंभोडा येथे साधला शेतकऱ्यांशी संवाद : पीक कर्जासह विविध विषयांवर चर्चा

शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता संवाद यात्रा!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भाजप सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात व त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, याकरिता शेतकरी संवाद यात्रा सुरू करण्यात आली असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी गुरुवारी केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी २५ मे २०१७ रोजी तालुक्यातील अंभोडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कृषी निविष्ठा पुरविणे, दर्जेदार व बीज प्रक्रिया केलेल्या बियान्यांचा वापर, कृषी कर्ज व पीक विमा आदी विषयांवर शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जि.प. अध्यक्ष उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, कर्ज माफीसंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबविण्याचे ठरविले आहे. शेतकरी बांधवांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, तसेच पिकांच्या होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण प्राप्त करण्यासाठी, कृषी पीक विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे. या योजनेत जास्तीत जास्त पिकांचा समावेश करण्यात आला असून, नुकसानासाठी त्वरित विमा मदत देण्यात येत आहे. ते म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातून भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भूजलपातळी वाढल्यामुळे एक पीक घेणारा शेतकरी दुबार पीक घेत आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळील नाले, बंधारे, यांचे खोलीकरण झाले की नाही, याची खात्री करून घ्यावी. यंदाच्या खरीप हंगामासाठी बीटी कापूस बियाणांसह अन्य बियाण्यांचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे. खतांचीही कुठलीही कमतरता खरीप हंगामात जाणवणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
ताफा अडवून शिवसेनेने दिले निवेदन
शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे देण्यात यावी, पेरणीपूर्वी कर्जमुक्ती करावी, शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा करावी, तुरीचा प्रश्न सोडवावा, आदी मागण्या घेऊन शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्यासह लखन गाडेकर यांनी आज पालकमंत्र्यांचा ताफा अडवून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना पेन्शन असावी, सापांपासून बचाव होण्यासाठी प्लास्टिक कोटेड सॉक्स व बुट अनुदान तत्त्वावर देण्यात यावे, अन्यथा बुलडाणा शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.