आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: August 4, 2014 00:01 IST2014-08-04T00:01:59+5:302014-08-04T00:01:59+5:30
धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीच्यावतीने धनगर समाजाचा भव्य मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर

आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा
मलकापूर : धनगर समाजाच्यावतीने घटनेत दिलेल्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची त्वरीत अंमलबजावणी करण्याच्या मागणीकरीता मलकापूर तालुक्यातील धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीच्यावतीने धनगर समाजाचा भव्य मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर नेण्यात येवून उपविभागीय अधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना स्वाक्षर्यांचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. केंद्राच्या महाराष्ट्र राज्याच्या राजपत्रामध्ये धनगर ही जमात अनुसुची क्र.३६ वर असताना सुध्दा महाराष्ट्र सरकारने गेल्या ६५ वर्षापासून या समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू केल्या नाहीत. त्यामुळे दर्याखोर्यांमध्ये राहणारा व महाराष्ट्रभर विखुरलेला धनगर समाज हा शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व इतर हक्कांपासून वंचीत राहत आहे. त्यामुळे धनगर समाजाला देण्यात आलेल्या घटनेतील एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मधुकर फासे, विनय काळे, चंद्रकांत कवळे, अनिल पाचपोळ, शिवदास सुरळकर, गजानन बोरसे, श्रीराम पुंडे, राजु बोरसे, ओंकार पाचपोळ, गोविंदा बोरसे, सौ.विद्या फासे, सौ.रंजना बोरसे, अमोल पाचपोळ यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. गोविंद विष्णु महाजन विद्यालयाजवळून वाजत गाजत भंडारा उधळत डोक्यात टोपी, रूमाल, हातात पिवळे झेंडे, आरक्षणाची मागणी करणारे फलक, शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत या मोर्चात मोठय़ा संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर मधुकर फासे, चंद्रकांत कवळे, विनय काळे, शत्रुघ्न पाचपोळ, सौ.रंजना बोरसे, विद्या फासे यांनी मोर्चाला संबांधित केले व आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे सादर केले. तसेच प्रलंबित मागण्या शासनाने मान्य न केल्यास यापुढे यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आपल्या भाषणातून दिला. या मोर्चामध्ये नानाभाऊ बाबर, साहेबराव फासे, डॉ.बोरसे, डॉ.सपकाळ, सौ.निता सपकाळ, रामचंद्र बोरसे, अनिता सुरळकर, निना बोरसे, संगीता सरकार, वंदना वरखडे, सुनंदा पाचपोळ, आत्माराम बोरसे, सोपान घोंगे, सौ.प्राजक्ता सपकाळ, सौ.सविता कवळे यांचेसह मलकापूर तालुक्यातील धनगर समाज बांधव आपल्या पारंपारीक धनगर वेशभूषेत मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार यांनी मागण्यांचे निवेदन राज्य शासनाकडे पाठवून मागणीबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मोर्चकर्यांना दिले. यावेळी अनेक धनगर समाज बांधवांची उपस्थिती होती.