तोतया वर्गणीदारांना अटक
By Admin | Updated: November 14, 2015 02:27 IST2015-11-14T02:27:44+5:302015-11-14T02:27:44+5:30
बुलडाणा शहरातील बालाजी संस्थानच्या नावाचा गैरवापर.

तोतया वर्गणीदारांना अटक
बुलडाणा: शहरातील मलकापूर रोडस्थित बालाजी मंदिरावर भंडारा असल्याची बतावणी करून वर्गणी जमा करणार्या दोन तोतया वर्गणीदारांना बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथे बालाजी सेवा समितीच्या पदाधिकार्यांनी पकडून शहर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी दोन्ही तोतया वर्गणीदारांची चौकशी सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत राहून शासकीय नियमांप्रमाणे तसेच जगजाहीर आणि पारदर्शक उपक्रम राबविणारे म्हणून बालाजी सेवा संस्थानची ओळख आहे; मात्र या संस्थानच्या नावाखाली काही तोतया वर्गणीदार वर्गणी गोळा करीत असल्याचे उघडकीस आले होते. पुन्हा तसाच प्रकार गुरुवारी घडला. बालाजी सेवा समितीकडून मंदिराच्या विकासासाठी देणगी स्वीकारली जाते. त्यापोटी देणगीदारांना नंबर व स्वाक्षरीसह पावती हमखास दिली जाते. असे असताना तालुक्यातील येळगाव येथे दोन जणांनी बालाजी मंदिरावर भंडार्यासाठी काही महिलांकडून पैसे घेतले. येळगाव येथील शिवाजी पुतळ्याजवळ अनिल साहेबराव एखनार (वय २५) रा. धामणगाव बढे आणि ईश्वर बाबलुराव धुमाळ (वय २0) रा. बोराखेड यांनी महिलांना भंडार्यासाठी पैसे मागितले. सदर महिलेने तत्काळ बालाजी सेवा समितीशी संपर्क साधला. त्यावरून समितीचे राजेश पिंगळे, संतोष पाटील, ओम शर्मा, राजू महाजन हे येळगाव येथे पोहोचले. त्यांनी दोन्ही तोतया वर्गणीदारांना पकडून शहर पोलीस स्टेशनमध्ये आणले. या दोघांविरोधात तक्रारीची नोंदणी करून बुलडाणा शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.