रुग्णसेवेचा बोजवारा!
By Admin | Updated: September 2, 2015 23:52 IST2015-09-02T23:52:43+5:302015-09-02T23:52:43+5:30
संग्रामपूर तालुक्यातील आरोग्यकेंद्रात सुविधाचा अभाव; १६ पदे रिक्त.

रुग्णसेवेचा बोजवारा!
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तालुक्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक यंत्रसामग्री तसेच तज्ज्ञांची पदे भरण्यात आली नसल्याने रूग्णांवर थातूरमातूर उपचार होत आहेत तर अनेक रुग्णांना रेफर करीत असल्याने नाहक भुर्दंड सोसावा लागत असून, वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे.
यामुळे शासनाचा आरोग्य सेवेचा दावा फोल ठरत आहे. संग्रामपूर तालुक्यामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून संग्रामपूर, सोनाळा, पातुर्डा, वानखेड या आरोग्य केंद्राचा समावेश आहे.
या आरोग्य केंद्रात एकूण १६ पदे रिक्त आहेत. तसेच जे कर्मचारी उपकेंद्रावर कार्यरत आहेत ते मुख्यालयी राहत नसल्यामुळे रूग्ण उपचार घेण्यासाठी आल्यानंतर कर्मचारी नसल्याने खासगी दवाखान्यामध्ये उपचार घ्यावा लागतो.
उपकेंद्रावर ज्या दिवशी कॅम्प आहे फक्त त्याचदिवशी उपस्थित राहतात. तालुक्यामध्ये शिवणी, हड्यामहल, सायखेड, पिंगळी, सावण, शेंबा ही गावे आदिवासी भागात येत असल्यामुळे येथील अवस्था तर बिकट आहे.
यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोमवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अपघातामध्ये जखमी झालेल्या रूग्णावर उपचार करण्यासाठी सोयी सुविधा नसल्याचे स्वीकारले. रुग्णालयांमध्ये एक्सरे मशीन, तसेच रूग्णांची रक्त, लघवी तपासण्याची सुविधा नाही. प्रसूतीवेळी शिजरची व्यवस्था नसल्याकारणाने रूग्णांना शेगाव येथे रेफर करावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.