माती परिक्षणाबाबत शेतक-यांमध्ये उदासीनता
By Admin | Updated: February 24, 2015 00:45 IST2015-02-24T00:09:10+5:302015-02-24T00:45:22+5:30
मोफत सुविधेकडे दुर्लक्ष; बुलडाणा जिल्ह्यातील केवळ १२५0 शेतक-यांनीच करुन घेतले माती परिक्षण.

माती परिक्षणाबाबत शेतक-यांमध्ये उदासीनता
खामगाव (जि. बुलडाणा): जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी मोफत माती परिक्षण मोहीम राष्ट्रीय केमीकल्स अँन्ड फर्टीलायझर्स लि. (भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम) यांच्यावतीने राबविणे सुरू आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत केवळ १२५0 शेतकर्यांनी माती परिक्षणासाठी नमुने दिले आहेत.
आजचा शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करू पाहत आहे. विदर्भातील शेतकरी हा नेहमीच शेती उत्पादनात मागे राहत असल्याचे दिसुन येते. बहूतांश शेती ही निसर्गाच्या भरवशावर अवलंबुन आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे शेतीतून पीक निघत नाही, कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी पार होरपळून जात आहे.
शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करीत आहेत. जमिनीची सुपीकता व तिची उत्पन्न क्षमता वाढविण्यास अधिक मदत व्हावी याकरीता शेतातील माती परिक्षणाची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस शेतात विविध किटकनाशके व रासायनिक खतांचा असंतुलीत वापर यामुळे जमीनची पोत बिघडत आहे. तेव्हा शेतातील दज्रेदार उत्पन्न वाढीसाठी कोणती पिके घ्यावी, पाण्याचा निचरा कसा करावा, खते किती प्रमाणात घ्यावी तसेच जमीनीतील अन्नद्रव्य वाढीसाठी प्रयत्न याकरीता माती परिक्षणाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करणारे शेती हे स्वत: खर्च करून माती परिक्षण करवून घेतात. मात्र सर्वच शेतकर्यांसाठी मोफत्र माती परिक्षण मोहीम राष्ट्रीय केमिकल्स अँन्ड फर्टीलायझर्स (आरसीएफ) च्या भुमी परिक्षण सेवा विभागातर्फे राबविण्यात येत आहे. यामध्ये आलेले मातीचे नमुने नागपुर येथील माती परिक्षण प्रयोग शाळेत पाठविण्यात येतात.
सन २0१४-१५ या कालावधीत जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, मेहकर, देऊळगाव राजा, चिखली व नांदुरा तालुक्यातून एकुण १२५0 शेतकर्यांनी माती परिक्षणाचे नमुने आरसीएफकडे दिले आहेत.