दहा रुपयांचे नाणे घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:07 IST2017-04-19T00:07:36+5:302017-04-19T00:07:36+5:30
अफवेमुळे नागरिक त्रस्त : नाणे स्वीकारण्यास व्यावसायिकांकडून नकार

दहा रुपयांचे नाणे घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार
मोताळा: दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवांमुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले असून, बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून नाणे स्वीकारले जात नसल्याने जमा झालेल्या नाण्यांचे काय करावे, असा प्रश्न नागरिकांसह व्यावसायिकांसमोर पडला आहे.
दहा रुपयांचे नाणे व्यवहारातून बंद झाले नाही, हे वारंवार सांगितल्यावरही नाणी बंद झाल्याच्या अफवांवर विश्वास ठेवून नागरिक कुणाकडूनही घेत नाही, तसेच व्यावसायिकांनी घेतल्यावर ग्राहक त्यांच्याकडून स्वीकारत नाही. या प्रकारामुळे सुज्ञ नागरिक व व्यावसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत. मागील काही दिवसांपासून दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा सुरू आहे. ग्रामीण भागासह मोताळा शहरातही हा प्रकार दिसून येत असून, बाजारात, बँकांमध्ये, पोस्ट आॅफिस आदी ठिकाणी दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याची बाब समोर आली. मोताळा स्वस्तिक जनरल स्टोअर्सचे मालक वीज बिल भरण्यासाठी पोस्टात गेल्यावर त्यांच्याकडून दहा रुपयांची नाणी स्वीकारली गेली नाही. याबाबत पोस्ट मास्टर सुपे यांच्याशी विचारणा केली असता, पोस्ट आॅफिसमध्ये अगोदरच ग्राहकांकडून नऊ हजार रुपयांची स्वीकारलेली दहाची नाणी जमा आहे. ग्राहक आमच्याकडून ही नाणी घेत नाही. शिवाय बँकेकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. पोस्ट आॅफिसची पैशांची जमा करण्याची मर्यादा २० हजार असल्यामुळे आम्ही अडचणीत आहोत. ग्राहकांनी पोस्ट आॅफिसमधील दहा रुपयांची नाणी स्वीकारली तर व्यवहार खोळंबणार नाही आणि आमची अडचणही दूर होईल. येथील स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्याला दहा रुपयांची नाणी बंद झाली का? तुम्ही दहा रुपयांची नाणी का स्वीकारत नाही? असे विचारले असता, दहा रुपयांची नाणी बंद झाली नसून, ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता व्यवहारामध्ये देवाण-घेवाण करावी. बँकेच्या काऊंटरवर मोठ्या प्रमाणात दहा रुपयांची नाणी आणल्यास मोजण्यास वेळ लागून बँकेच्या व्यवहारावर त्याचा परिणाम होतो. येथील पोस्ट आॅफिसचे आमच्या बँकेत खाते नाही; मात्र दहा रुपयांच्या शंभर नाण्यांची पिशवी करून आणल्यास पैसे स्वीकारणे सोयीचे होईल. असे असले तरी मागील काही दिवसांपासून मोताळा परिसरात दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याने सर्वच अडचणीत आले आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक नागरिकांसह छोटे-मोठे व्यावसायिक, फेरीवाले, आठवडी बाजारातील किरकोळ व्यापाऱ्यांनी दहा रुपयांची नाणी ग्राहकांकडून स्वीकारली आहेत; मात्र अलिकडे आता ग्राहक त्यांच्याकडून दहा रुपयांची नाणी स्वीकारत नाही. त्यामुळे अनेकांकडे हजारो रुपयांची दहा रुपयांची नाणी जमा झालेली आहे. यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृतीची गरज असून, बँकांनीही सहकार्य करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. १० रुपयांची नाणी चलनातून बाद झालेली नाही. नागरिकांनी दहा रुपयांची नाणी व्यवहारात वापरावी. लहान-मोठे व्यवहार सहज व्हावे, यासाठीच नाणी असून, नागरिकांनीही निश्चिंत होऊन व्यवहारात नाण्यांची देवाण-घेवाण करावी. दहा रुपयांची नाणी बंद झाल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
दहा रूपयांचे नाणे बंद झाले नसून, बंद झाल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. दहा रूपयांचे नाणे न स्वीकारणाऱ्यावर कलम १२४ (अ) नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
- अजय अेडगावकर, शाखाधिकारी, स्टेट बँक, मोताळा