डेंग्यूचा रुग्ण आढळला
By Admin | Updated: October 18, 2014 00:07 IST2014-10-18T00:07:26+5:302014-10-18T00:07:26+5:30
डोणगावात आरोग्य धोक्यात, तापाची साथ सुरू.

डेंग्यूचा रुग्ण आढळला
डोणगाव (बुलडाणा) : परिसरात डेंग्यूसदृश तापेने थैमान घातले असून, घरोघरी रुग्ण तापाने फणफणत पडले आहेत. येथे डेंग्यूसदृश तापेचा रुग्ण आढळून आला आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे वॉर्ड क्र.२ मध्ये शिक्षक चंद्रकांत माधवराव वायाळ यांचा मुलगा ऋतुराज यास ताप येत असल्याने त्याच्यावर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारांती त्याला डेंग्यूसदृश ताप असल्याचे सिद्ध झाल्याने ऋ तुराजला औरंगाबाद येथे शुक्रवारी उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. डोणगाव येथे अनेक बालकांना साथीच्या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोणगावसह परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डासाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डेंग्यूसदृश तापेसारख्या विविध आजाराने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात काही ठिकाणी पाइप लाइन लिकेज असल्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याकडे ग्रामपंचायतने लक्ष देऊन परिसरात स्वच्छता मोहीम, फॉगिंग मशिनद्वारे फवारणी, पिण्याच्या पाण्याची तपासणी अशा विविध उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.