नगराध्यक्ष, नगरसेवकांविरुद्ध सानंदांकडून मानहानीची नोटिस

By Admin | Updated: April 28, 2017 00:45 IST2017-04-28T00:45:02+5:302017-04-28T00:45:02+5:30

खामगाव : नगर परिषदेच्या २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेमध्ये ठराव क्र.२३ नियम व कायद्याची पायमल्ली करीत गैरकायदेशीर पारीत केला आहे.

Demonstrancy notice against municipal corporation, corporators | नगराध्यक्ष, नगरसेवकांविरुद्ध सानंदांकडून मानहानीची नोटिस

नगराध्यक्ष, नगरसेवकांविरुद्ध सानंदांकडून मानहानीची नोटिस

पालिकेत खळबळ : मुख्याधिकाऱ्यांचाही समावेश

खामगाव : नगर परिषदेच्या २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेमध्ये ठराव क्र.२३ नियम व कायद्याची पायमल्ली करीत गैरकायदेशीर पारीत केला आहे. सदर ठरावामध्ये बदनामीकारक मजकुर नमूद केल्याचा आरोप करीत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी खामगाव पालिकेतील नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवक व मुख्याधिकारी यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रांमध्ये बिनशर्त जाहीर माफी मागावी. अन्यथा सर्वांविरूध्द २ कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करण्यात येईल. असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.
पालिकेच्या २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत शिवाजी व्यायाम मंदीर संदर्भातील ठराव पारीत करण्यात आला. या सभेमध्ये झालेल्या चर्चेची वस्तुस्थिती न लिहिता बदनामी होईल या उद्दिष्टाने एक ते दीड महिन्यानंतर सदर सभेचे कार्यवृत्त गैरकायदेशीररित्या नोंदविले आहे. अत्यंत चुकीच्या पध्दतीने व बेकायदेशीरपणे राजकीय दबावाखाली नोटीस घेणाऱ्यांनी नियमाची पायमल्ली करण्यास मदत केली असा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे. २८ फेब्रुवारी रोजीच्या सभेतील ठराव हा चुकीचा असून त्यामध्ये चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात आले आहेत. वास्तविक वरील विषयातील कायदेशीर बाजु व परिस्थितीसापेक्ष बाजु समजून घेऊन नियमांचे पालन करून साधक-बाधक चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक सोबतच मुख्याधिकारी यांनी मुळ दस्तावेजाचे अवलोकन न करता सत्य, असत्य पडताळून न पाहता केवळ राजकीय आकसापोटी बेकायदेशीर चर्चा करून खोटे आरोप लावत बदनाम केल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या नोटीसमुळे नगर पालिकेत खळबळ उडाली असून सत्ताधाऱ्यांनी या नोटीसला प्रत्त्युत्तर म्हणून कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारल्याची माहिती आहे.

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची नोटिस पालिकेला प्राप्त झाली आहे. या विरोधात न्यायालयीन लढा देण्यास आपली तयारी आहे. तथापी, ही नोटिस म्हणजे पालिकेवर दबाव आणण्याची खेळी आहे.
- अनिता डवरे,नगराध्यक्षा खामगाव

Web Title: Demonstrancy notice against municipal corporation, corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.