पारंपरिक आकाशदिव्यांना मागणी
By Admin | Updated: October 17, 2014 23:33 IST2014-10-17T23:33:36+5:302014-10-17T23:33:36+5:30
आली दिवाळी, खामगावात स्टॉल सजले; बाजारपेठांमधील गर्दी वाढली.

पारंपरिक आकाशदिव्यांना मागणी
खामगाव (बुलडाणा) : दीपावलीचा अविभाज्य भाग असणारे नानाविध प्रकारचे आकाशकंदील बाजारपेठेत दाखल झाले आहेत. यामध्ये चायना मेड आकाशदिव्यांचाही समावेश आहे. चायना मेड आकाशदिवे कमी किमतीत उपलब्ध असले तरीही शहर आणि तालुक्यातील जनतेची पारंपरिक पद्धतीच्या आकाशदिव्यांनाच मागणी आहे. शहरातील विविध विक्रेते प्रामुख्याने नागपूर, मुंबई आणि इंदौर येथून आकाशदिवे मागवितात.
दीपावली पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेतील अनेक दुकाने आकाशदिव्यांनी सजली आहेत. आकाशकंदील आकर्षक दिसण्यासाठी मुख्यत्वे प्लॅस्टिक आणि मेटल पेपरपासून बनविण्यात येतात. परंतु यामुळे पर्यावरणाची हानी होते. कारण सहसा एकदा दीपावलीत वापरलेला आकाशदिवा नंतर कोणी वापरत नाही. प्रत्येकवेळी नवीन आकाशदिव्यांची खरेदी करण्यात येते. पर्यावरण संवर्धनासाठी मागील काही वर्षांपासून पर्यावरणपूरक वस्तू बनविण्याकडे कल वाढला आहे. कागद व कापडापासून बनविलेले आकाशदिवेही विक्रीस आहेत. या आकाशकंदिलांच्या किमती सामान्यांना परवडतील अशा १00 रुपये ते ३00 रुपयांदरम्यान आहेत. इको फ्रेंडली आकाशदिव्यांनाही पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. बहुतांशी सर्वच आकाशकंदील घडीच्या प्रकारात उपलब्ध आहेत. पारंपरिक पध्दतीने बनविण्यात आलेल्या आकाशदिव्यांना इतर सर्व प्रकारांपेक्षा अधिक पसंती आहे. सध्या बाजारपेठेत ५0 ते ६0 प्रकारचे आकाशकंदील उपलब्ध आहेत.