शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:01+5:302021-04-24T04:35:01+5:30
सध्या आधुनिक पद्धतीने शेती करावी लागत असल्याने पेरणीकरिता व इतर मशागतीकरिता ट्रॅक्टर व इतर अवजारे न्यावी लागतात. काही ...

शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
सध्या आधुनिक पद्धतीने शेती करावी लागत असल्याने पेरणीकरिता व इतर मशागतीकरिता ट्रॅक्टर व इतर अवजारे न्यावी लागतात. काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरुंद झाले असल्याने अवजारे व साहित्य दूरवरून न्यावे लागत आहे़ यामध्ये वेळ वाया जात असतो़ त्याचा परिणाम शेतीउत्पादनावर होत असल्याने तालुक्यातील शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे़
दिवसेंदिवस भोगवटदारांची संख्या वाढत असून शेतात येण्या-जाण्याच्या कारणावरून वाद निर्माण होतात़ हे वाद कधीकधी कोर्टकचेरीपर्यंत जाऊन, एकमेकांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्ही अनाठायी खर्च होतात़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला बाधा पोहोचते; तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी असूनसुद्धा केवळ शेतात जाण्यासाठी रस्ते बरोबर नसल्याने शेतकरी फळबाग भाजीपाला इतर पिकांचे उत्पन्न घेऊ शकत नाही़ दुसरीकडे, काही ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या जुन्या वहिवाटीच्या पाणंद रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येत आहे़ शेतकऱ्यांना शेती मशागत करण्यासाठी फार मोठा त्रास सहन करावा लागतो़ शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पीककापणी व इतर कामासाठीसुद्धा वेळेवर अवजारे शेतामध्ये पोहोचू शकत नसल्याने शेतकऱ्याचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे़ इच्छा असूनही शेतकरी रस्त्याअभावी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषी गोदाम उभारणे यांसारखे जोडधंदे करू शकत नाही़ सर्पदंश, वीज कोसळणे, पूर येणे, आग लागणे इतर नैसर्गिक आपत्तींवर मात करणे शेतरस्ते बरोबर नसल्यामुळे शक्य होत नसल्याने आतापर्यंत तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांचे प्राण गेले आहे़त. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना नदी-नाले पार करून शेतात जावे लागते़ शेतात गेल्यानंतर पाऊस आला तर नदी-नाले पुराने भरल्यावर शेतकऱ्यांना रात्रभर उपाशीपोटी शेतातच मुक्कामी राहावे लागते. अशा त्रासाला कंटाळून काही शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या आहेत. लोणार तालुक्यातील प्रलंबित शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सहदेव लाड, उपाध्यक्ष अनिल मोरे, सचिव अनिल लांडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे़