सिंचनासाठी पाईपलाईनचे पाणी साेडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST2021-01-21T04:31:02+5:302021-01-21T04:31:02+5:30
हिवरा आश्रमः पेनटाकळी कॅनाॅलचे पाणी शेतात झिरपत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे कॅनाॅलचे पाणी पाईपलाईनने साेडण्याची मागणी शेतकऱ्यांनी ...

सिंचनासाठी पाईपलाईनचे पाणी साेडण्याची मागणी
हिवरा आश्रमः पेनटाकळी कॅनाॅलचे पाणी शेतात झिरपत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे कॅनाॅलचे पाणी पाईपलाईनने साेडण्याची मागणी शेतकऱ्यांनी १९ जानेवारी राेजी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. वारंवार निवेदने देऊनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मागणी मान्य न झाल्यास कॅनाॅलच्या पाण्यात उडी घेण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
पेनटाकळी प्रकल्पाचे पाणी कॅनाॅलच्या माध्यमातून साेडण्यात येत आहे. कॅनाॅलमधून पाणी झिरपत असल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. या पाण्यामुळे जमिनी खारवटल्या असून पिकांचेही नुकसान हाेत आहे. वारंवार निवेदन देऊनही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे तत्काळ कॅनाॅलचे पाणी बंद करा अन्यथा मी कॅनाॅलच्या पाण्यात उडी मारून जीव देईल असा इशारा संजय बाबुराव वाहेकर यांनी दिला आहे. दुसऱ्या निवेदनात रायपूर,दुधा,ब्रह्मपुरी येथील शेतकरी बांधवांनी १ ते ११ किमी कॅनाॅलचे पाणी पाईपलाईनद्वारे नेण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास धरणाच्या पाण्यात बसून उपोषण करण्याची मागणी एकनाथ सास्ते,शालीकराम काळे,साहेबराव वाहेकर,बबन वाहेकर,संजय वाहेकर,दत्ता काळे,प्रमेश्वर धांडे मामासह आदी शेतकऱ्यांनी केली आहे.