आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
By Admin | Updated: March 3, 2016 02:12 IST2016-03-03T02:12:04+5:302016-03-03T02:12:04+5:30
कर्मचा-यांवर अतिरिक्त कामांचा भार; रुग्णालयात १९४ पदे रिक्त.

आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
बुलडाणा: जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत असलेल्या त्रुटी नेहमीच चर्चेचा विषय राहिल्या आहेत. आरोग्य प्रशासनातील अद्यापही बरीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडत असून, बर्याच रुग्णांना सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. रुग्णालयात ७५३ पदांपैकी १९६ पदे रिक्त आहे. या रिक्त पदांचे ओझे येथील कर्मचार्यांवर पडत असून, गैरव्यवस्थापनाबाबत त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असणारी या सर्व रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे गरीब रुग्णांसाठी वरदान आहेत. ही आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी बुलडाणा शहरासह खामगाव, शेगाव, मलकापूर येथे उपजिल्हा सामान्य रुग्णालय सुरु करण्यात आले. याशिवाय बिबी, देऊळगाव मही, चिखली, लाखनवाडा, वरवट बकाल, सिंदखेडराजा, मोताळा, धाड, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, जळगाव जामोद आदी बारा गावांमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. या रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांवर उपचार केले जातात.
जिल्हा सामान्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी व अधिकार्यांची १९६ पदे रिक्त आहे; मात्र बरेच वर्षांंपासून रुग्णालयात पदे रिक्त असल्यामुळे कर्मचार्यांना काम करण्यात अडचणी निर्माण होत आहे. या रिक्त पदांमुळे कर्मचार्यांवर अतिरिक्त पदांची जबाबदारी दिली गेली आहे. पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत.