अंगणवाड्यात दिला जातो निकृष्ट पोषण आहार
By Admin | Updated: November 29, 2014 00:02 IST2014-11-29T00:02:40+5:302014-11-29T00:02:40+5:30
चिखली तालुक्यातील प्रकार, चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.

अंगणवाड्यात दिला जातो निकृष्ट पोषण आहार
चिखली (बुलडाणा) : तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये जाणार्या बालकांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिल्या जात असल्याची बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उघडकीस आणली असून पोषण आहार पुरविणार्या कंत्राटदाराकडून निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळल्या जात असल्याने हा प्रकार तातडीने रोखण्यात यावा व संबंधीत कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा तालुकाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी दिला आहे.
तालुक्यात एकूण ३२३ अंगणवाड्या असून यामध्ये १0 हजार ३९४ बालके दाखल आहेत. या बालकांना पोषण आहार पुरविण्याचे काम कंत्राटी पध्दतीने होत असल्याने कंत्राटदार आ पल्या अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार बालकांना पुरवित आहे. पोषण आहारातील धान्य अत्यंत हिन दर्जाचे असून तांदूळ, चवळी, मटकी, हरबरा, मसूर दाळ, तूर दाळ, सोयाबीन या कडधान्याला किड लागलेली असते. हे धान्य जनावरेही खाऊ शकणार नाहीत, असे असते. धान्य पुरविणारी एजन्सी व ठेकेदार केवळ नफा कमविण्यात मश्गूल असून संबंधित अधिकारी व ठेकेदाराचे साटेलोटे असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. ठेकेदार मंडळी निष्पाप कोवळ्या मुलांच्या जीवाशी एकप्रकारे खेळत असून त्यांना बालकांच्या आरोग्याशी काहीच देणेघेणे नसल्याने कुपोषण कमी होण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला पोषण आहार बालकांच्या जीवावर उठला आहे.
विकास औद्योगीक संस्था खामगाव यांच्याकडून सदरचा पोषण आहार पुरविण्यात आला होता. याबाबत सेविकांकडून किंवा सुपरवायझरकडून कुठल्याही प्रकारची माहिती कार्यालयात पुरविण्यात आली नसल्याची प्रभारी सांख्यीकी विस्तार अधिकारी बी.पी.आंभोरे यांनी दिली.