स्वनिधीतून उपेक्षीतांसाठी इमारत बांधणारा सेवा समर्पीत शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 11:24 IST2020-06-21T11:23:32+5:302020-06-21T11:24:58+5:30
स्वत:च्या नोकरीतून मिळणाऱ्या अर्थार्जनातून वंचीतांप्रती कृतीशील गहिवर प्रकट २६ विद्यार्थ्यांच्या पालकतची जबाबदारी सांभाळत आहेत.

स्वनिधीतून उपेक्षीतांसाठी इमारत बांधणारा सेवा समर्पीत शिक्षक
- ओमप्रकाश देवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : उपेक्षित व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वनिधीतून हक्काची इमारत बांधून २६ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी गेल्या ११ वर्षापासून सातत्याने धडपडणारे अनंत दामोदर शेळके हे व्यक्तीमत्व. मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे त्यांचे हे कार्य सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक म्हणून ते कार्यरत आहे. शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय स्वत:च्या नोकरीतून मिळणाऱ्या अर्थार्जनातून वंचीतांप्रती कृतीशील गहिवर प्रकट २६ विद्यार्थ्यांच्या पालकतची जबाबदारी सांभाळत आहेत. या मुलांच्या संगोपनासाठी स्व निधीतून सुसज्ज इमारत त्यांनी उभी केली आहे. त्यांना भोजन, निवास, शिक्षणासह सर्व सुविधा ते मोफत पुरवीत आहे.
स्वामी विवेकानंद व प.पू.शुकदास महाराजांच्या विचारांना आदर्श मानून त्याला कृतीतरुप देण्याचं काम अनंत शेळके नित्यानंद सेवाप्रकल्पाच्या माध्यमातून करत आहे.बेघर, अनाथ, एकल अनाथ, आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील या मुलांचे ते संगोपन करत आहेत. आतापर्यंत ३९ विद्यार्थी शासकीय, निमशासकीय सेवेत गेले आहेत. आता हेच विद्यार्थीही मदत करत आहेत. चिखली-मेहकर मार्गावर तीन हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेल्या हक्काच्या या पक्क्या घरात हे विद्यार्थी राहतात. मदती अभावी शिक्षणापासून वंचित राहणाºया विद्यार्थ्यांसाठी शेळकेंनी हे हक्काच घर उपलब्ध केल आहे. माजी विद्यार्थी राजेश निकस, नीलेश निकस, चेतन जाधव, सुशील मालवी, ओम निकस, सदानंद शेळके, विशाल पवार, शुभम अवचार, नंदू भोंबे यांचे त्यांना सहकार्य मिळत आहे. जि. प. चे शिक्षकही धान्य, वस्तूंची मदत करतात. उपशिक्षणाधिकारी पागोरे हे ही त्यांना मदत करत आहेत.
अडचणीमुळे शिक्षणापासून कोणी वंचीत राहू नये, अनाथ, एकल अनाथांसह निराधारांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणूण त्यांना मदत करण्याची कल्पना सुचली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उपक्रम सुरू केला. अनेकांचे सहकार्य मिळाले.
-अनंत शेळके,
- शिक्षक, हिवरा आश्रम
एका विद्यार्थ्यांला दत्तक घेण्यापासून सुरू झालेला प्रकल्प आज २६ विद्यार्थ्यांना आधार देत आहे. कारण मुले ही ईश्वराची अवतार असून त्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. ही सेवा अखंड रहावी यासाठी हा सेवायज्ञ सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू. -अर्चना शेळके
- पत्नी