जिल्हा बँकेत व्यवहार सुरू करण्याचा ठराव मंजूर!
By Admin | Updated: May 25, 2016 01:42 IST2016-05-25T01:42:01+5:302016-05-25T01:42:01+5:30
बुलडाणा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभेत जिल्हा बँकेत व्यव्हार सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

जिल्हा बँकेत व्यवहार सुरू करण्याचा ठराव मंजूर!
बुलडाणा : बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेला शासनाने २0७ कोटीची मदत केल्यामुळे ही बँक पुनरूज्जीवित झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व व्यवहार पूर्ववत या बँकेमध्ये सुरू करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात जि.प.अध्यक्ष अलका चित्रांगण खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते पांडुरंगदादा पाटील यांनी जिल्हा बँकेत खाते पूर्ववत करण्याबाबत ठराव मांडला.
शेतकर्यांच्या जिव्हाळ्याची बँक पुन्हा सुरू झाल्यामुळे सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या ठरावाला काँग्रेसचे गटनेते तसेच माजी सभापती बलदेवराव चोपडे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. शासनाने सन २0१४ मध्ये जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहार हे सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा बँकेतील सर्वात मोठा खातेदार असलेल्या जिल्हा परिषदेच्या ठेवी या राष्ट्रीयीकृत बँकांत वळती झाल्या. त्याचाही फटका जिल्हा बँकेला बसला, हे विशेष!