युवकाचा मृत्यू; अहवालाआधीच मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 11:04 IST2020-06-21T11:03:58+5:302020-06-21T11:04:41+5:30
या युवकाचा १९ जून रोजी मृत्यू झाला तर त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल २० जून रोजी आला.

युवकाचा मृत्यू; अहवालाआधीच मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/धामणगाव बढे : मोताळा तालुक्यताली धामणगाव बढे येथील ३० वर्षीय संदिग्द रुग्णांच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोताळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचा अहवाल येण्याआधीच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने आता महसूल व आरोग्य यंत्रणा या अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहे. दरम्यान सायंकाळ पर्यंत ११ हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून दहा जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात या युवकाचा १९ जून रोजी मृत्यू झाला तर त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल २० जून रोजी आला. त्यामुळे प्रशासनाची ही कसरत सुरू झाली आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होवू शकले नाही. मात्र वैद्यकीय संकेत आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे असे गोंडस नाव देत अशी प्रकरणे दुर्लक्षीत केल्या जात असल्याचे पुढे येत आहे.
मृतक युवकाचे कुटुंब मलकापूर येथे ईदगाह परिसरात वास्तव्यास आहे. परंतु धामणगाव बढे येथे सुद्धा बहीण व इतर नातेवाईक राहत असल्यामुळे हा युवक काही दिवसापासून गावात होता. नऊ जून ते १८ जून दरम्यान तो आजारी असल्याने त्याने धामणगाव बढे येथेच उपचार घेतले. न्युमोनियाची लक्षण असल्याने १६ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले. १९ जून रोजी सकाळी उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला. आरोग्य प्रशासनाने अॅम्ब्युलंसद्वारे मृतदेह धामणगाव बढे येथे नातेवाईकाच्या सुपूर्द केल्यानंतर १९ जून रोजीच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर २० जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तातडीने तहसीलदार व्ही. एस. कुमरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र पुरी, बीडीओ अरुण मोहोड, धामणगाव बढे येथे पोहोचले. दाखल झाले. मृतक युवकाच्या घर परिसरातील ५०० मीटर पर्यंतचा भाग पोलीस प्रशासनाने सील केला. धामणगाव बढे येथे पुढील तीन दिवस जनता कर्फ्यु लावण्यात आला. ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला. सील केलेल्या परिसरात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. डीएसपी रमेश बरकते यांनी धामणगाव बढे येथील स्थितीचा आढावा ही तातडीने घेतला आहे. पिंपळगाव देवी तथा ब्राम्हंदा रस्त्यावर चेकपोस्टही तयार करण्यात आली आहे.
३ पॉझिटीव्ह; रुग्ण संख्या १५१
जिल्ह्यात शनिवारी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून यात मलकापूरमधील पारपेट येथील २९ वर्षाचा व्यक्ती व सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. दरम्यान, तिसरा पॉझिटिव्ह हा धामणगाव बढे येथील असून त्याचा १९ जून रोजीच जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५१ वर पोहोचली आहे.
१४ व्यक्ती कोरोना मुक्त
जिल्ह्यात २० जून रोजी १४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना मुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील ९, मलकापूर तालुक्यातील धरणगाव येतील एक, बहापुरा येथील महिला, ब्राम्हण चिकना येथील दोघे आणि लोणार तालुक्यातीलच भूमराळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या १०९ झाली आहे. जिल्ह्यासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल.
सध्या ३६ अॅक्टीव रुग्ण
बुलडाणा जिल्ह्यात सध्या ३६ कोरोना बाधीत रुग्ण असून त्यांच्यावर शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथील आयासोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहे. या सर्व रुग्णांची स्थिती स्थिर आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत सात व्यक्तींचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी चार व्यक्तींचा मृत्यू हा एकट्या जून महिन्यात झाला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची तीव्रता जिल्ह्यात वाढत असल्याचे चित्र आहे.