अज्ञात तापाने विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: September 6, 2014 01:16 IST2014-09-06T01:16:26+5:302014-09-06T01:16:26+5:30
मातोळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील विद्यार्थ्याचा अज्ञात तापाने मृत्यू

अज्ञात तापाने विद्यार्थ्याचा मृत्यू
मोताळा : तालुक्यातील धामणगाव बढे येथील एका विद्यार्थ्याचा अज्ञात तापाने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ४ सप्टेंबर रोजी घडली. अक्षय गोपाल रोकडे(१९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. धामणगाव बढे येथील शाळेत १२ वी उत्तीर्ण होऊन आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याची लगबग विद्यार्थ्याची सुरू होती.
धा. बढे येथील वार्ड क्रमांक तीनमधील अक्षय रोकडे याला गुरूवारी अचानक ताप आल्याने सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तत्काळ बुलडाणा येथील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले. दरम्यान, अक्षयच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉ लद्धड यांच्या दवाखान्यात नेत असता त्याचा मृत्यू झाला. अक्षय रोकडे गरीब कुटुंबातील असून, आई-वडील मोलमजुरी करून त्याचे शिक्षण करीत होते. अक्षयच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
धामणगाव बढे गावात सद्या सर्वत्र मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असून, नाल्या सफाईअभावी सांडपाणी साचून राहत असल्यामुळे आजार उद्भवत असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील आरोग्य केंद्रामध्ये रूग्णांची गर्दी वाढलेली आहे. सर्वत्र घाण पाणी साचल्यामुळे विविध प्रकारच्या आजाराने येथील नागरिक ग्रस्त असून, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतकडून कोणतीही जनजागृती व उपाय योजना केल्या जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत. मागील आठ दिवसांपासून अनेक आजारांनी येथे तोंड उघडलेले आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असल्यामुळे पिण्यासाठी स्वच्छ पाणी व गावातील साफसफाईसह संपूर्ण गावात धूळफवारणीची मागणी नागरिकांसह करण्यात आली आहे.