चुकीच्या उपचारामुळे मुलीचा मृत्यू; डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 31, 2014 23:50 IST2014-08-31T23:47:42+5:302014-08-31T23:50:23+5:30
९ वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी मेहकर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार एका डॉक्टरविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

चुकीच्या उपचारामुळे मुलीचा मृत्यू; डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल
मेहकर (बुलडाणा) : एका ९ वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी मेहकर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार एका डॉक्टरविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथील रहिवासी विजय आश्रूजी मोरे यांची ९ वर्षीय मुलगी कु.प्रमिता हिला ताप आल्याने १२ जुलै २0१४ रोजी मेहकर येथील डॉ. विलास वर्हाडे यांच्या दवाखान्यात भरती करण्यात आले होते. डॉक्टरने तिला हायफिव्हर मलेरिया असल्याचे सांगून उपचार केले. तसेच तिचे रक्त तपासणीसाठी पाठविले; मात्र रक्त तपासणीत तिला मलेरिया नसल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे त्याचदिवशी मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप मुलीच्या वडीलांनी केला होता. त्यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी फिर्यादी विजय मोरेकडून अँड. संजय नवघरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने याप्रकरणी मेहकर पोलिस स्टेशनला डॉ. वर्हाडे यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मेहकर पोलिसांनी डॉ. विलास वर्हाडे यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0२, २0१, ४६९, ४७१, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.