बुलडाणा : जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने माेठ्या प्रकल्पामध्ये अल्प जलसाठा आहे. जिल्ह्यातील माेठ्या धरणांपैकी एक असलेल्या खकडपूर्णा मृत जलसाठा आहे. दुसरीकडे मेहकर तालुक्यातील काेराडी प्रकल्प मात्र एकाच पावसात ओव्हरफ्लाे झाला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस पाऊस आल्यानंतर पावसाने दांडी मारली. जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे माेठे प्रकल्प अजूनही काेरडेच आहेत. नळगंगा प्रकल्पांमध्ये केवळ २८.३८ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात आतापर्यंत केवळ १३० मिमी पाऊस झाला. पेनटाकळी प्रकल्पाच्या क्षेत्रात आतापर्यंत ४२६ मिमी पाऊस झाला असून, २९.३३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. खडकपूर्णा प्रकल्पात आतापर्यंत ९७ मिमीच पाऊस झाल्याने धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पात केवळ मृत जलसाठा उपलब्ध आहे.
मध्यम प्रकल्पांनीही गाठला तळ
प्रकल्प क्षेत्रांमध्ये अजूनही मुबलक पाऊस न झाल्याने मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील पलढग प्रकल्पात १३.५८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात आतापर्यंत ९० मिमी पाऊस झाला आहे, तसेच ताेरणा प्रकल्पात २१.५५, उतावळी प्रकल्पात २९.७६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
काेराडी प्रकल्प ओव्हरफ्लाे
चिखली आणि मेहकर तालुक्यात एकाच दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे काेराडी प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात ३०६ मिमी पाऊस झाला आहे. एकाच दिवशी हा प्रकल्प ओव्हरफ्लाे झाला हाेता, तसेच मस प्रकल्पात ४,१़१६ टक्के तर मन प्रकल्पात ४४.६६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
पाणीपुरवठा याेजना हाेणार प्रभावीत
आगामी काळात प्रकल्पाच्या क्षेत्रात जाेरदार पाऊस न झाल्यास, अनेक शहरांच्या पाणीपुरवठा याेजना प्रभावीत हाेण्याची शक्यता आहे. बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव प्रकल्पानेही तळ गाठला आहे. हीच स्थिती जिल्ह्यातील इतर प्रकल्पाची आहे. त्यामुळे पाऊस न आल्यास पिकाचे तर नुकसान हाेणारच आहे, दुसरीकडे पाणीटंचाईही निर्माण हाेणार आहे.
असा आहे जलसाठा
खडकपूर्णा ००
नळगंगा २८.३८
पेनटाकळी २९.३३
काेराडी १००
ज्ञानगंगा ६८.६७
पलढग १३.५८
मस ४१.१६
मन १६.४५
ताेरणा २१.५५
उतावळी २९.७६