शेगाव तहसील कार्यालयात धोकादायक वीज यंत्रणा

By Admin | Updated: November 7, 2014 23:21 IST2014-11-07T23:21:21+5:302014-11-07T23:21:21+5:30

कालबाह्य अग्निशामक यंत्रे : फायर एक्सस्टिंगविशरची मुदत संपली.

Dangerous power system at Shegaon tehsil office | शेगाव तहसील कार्यालयात धोकादायक वीज यंत्रणा

शेगाव तहसील कार्यालयात धोकादायक वीज यंत्रणा

फहीम देशमुख / शेगाव
येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय इमारतीमध्ये आगीचा धोका टाळण्यासाठी सुरक्षा राखण्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, हा कर्मचारी आणि नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय इमारतीचे फायर ऑडिट करून घेतलेले नाही. कालबाह्य अग्निशामक यंत्रे आणि विद्युत तारांचे कोंडाळे पाहिल्यास येथील सुरक्षा व्यवस्थाच किती सुरक्षित आहे, याची जाणीव होतो. लोकमतने शुक्रवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या धोकादायक बाबी प्रकर्षाने जाणवल्या.
मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय इमारतींचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु ही बाब अद्याप कोणी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. शेगाव येथील शासकीय इमारतीमध्ये अक्षरक्ष: तारांचे कोंडाळे लटकताना दिसतात. तहसील कार्यालयाची इमारत ही इंग्रजकालीन नसून, या कार्यालयात तालुक्यातून दररोज शेकडो नागरिक विविध कामानिमित्ताने येतात. या इमारतीमध्ये असलेली विद्युत वायरिंग मोठय़ा अपघाताला आमंत्रण देत आहे.
तहसील कार्यालयाच्या पॅसेजमध्ये विद्युत तारा जमिनीपर्यंत टेकल्या आहे. यामध्ये येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांचा स्पर्श होत आहे. कार्यालयामधील खोल्यांमध्ये याही पेक्षा बिकट परिस्थिती आहे. वीज वायर जोडण्या तशाच सोडून देण्यात आल्या असून, या जोडण्यांना एकाद्याचा स्पर्श झाला, तर मृत्यू ओढवू शकतो, अशी आवस्था आहे. यामुळे येथे येण्यार्‍या व्यक्तींना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येते. इमारतीची ही स्थिती फारशी उत्तम नाही. ठिकठिकणच्या फरशा व फ्लोरिंग उखडलेल्या असून, इमारतीमध्ये खड्डे पडलेले आहेत.
या शासकीय कार्यालयांच्या देखरेख व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांच्यावर असताना आजपर्यंत कुठलीही कामे त्यांनी केलेली नसल्याने त्यांचा कामचुकारपणा नागरिकांच्या मुळावर उठल्याचे दिसून येत आहे.
या इमारतीत प्राथमिक सुरक्षाव्यवस्था म्हणून अग्निशामक यंत्रे (फायर एक्सस्टिंगविशर) बसविण्यात आले आहेत. त्यावर १९९९ मध्ये रिफील केल्याचा उल्लेख असून, त्याची एक वर्षाची मुदत आहे; परंतु ही मुदत संपूनही १५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. विशेष म्हणजे, येथील एकाही कर्मचार्‍याला आग विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे दुर्दैवाने आग लागल्यास ती कशी विझविणार, हाच खरा प्रश्न आहे.

Web Title: Dangerous power system at Shegaon tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.