धोकादायक पूल ठरतोय जीवघेणा
By Admin | Updated: August 10, 2014 23:58 IST2014-08-10T23:58:28+5:302014-08-10T23:58:28+5:30
धाड : प्रमुख मार्गावरील नागरी वस्तीस धोका

धोकादायक पूल ठरतोय जीवघेणा
धाड : स्थानिक गावातून जाणार्या प्रमुख मार्गावरील पूल रहदारीसह नागरी वस्तीस धोक्याचा ठरला आहे. या पुलामुळे पावसाळ्यात नागरिकांना नैसर्गिक आपत्तीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या काही वर्षांपासून धाड गावाजवळून जाणार्या बाणगंगा नदीवर धामणगाव रोडवरील पुलामुळे आणि औरंगाबाद मार्गावरील नाल्यावरील पुलाने सतत पुराचे पाणी हे गावालगतच्या नागरी वस्तीत शिरते. सिमेंटची नळकांडे रचून तयार करण्यात आलेल्या पुलात वर्षानुवर्षे गाळ व काडीकचरा साचत असल्याने हा पूल बंद अवस्थेत असल्याने नदीला येणार्या पुराचे पाणी या ठिकाणी अडून ते नागरी वस्तीत शिरते, तर पुलावरून पाणी वाहण्याच्या प्रकाराने तासन्तास वाहतूक खोळंबते.
साधारण १५ ते १८ वर्षांपूर्वी करडी आणि धाड या गावांच्या लगत असणारी कृषी क्षेत्राची जमीन संपादित करून करडी गावालगत धरणाची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन स्थितीत गावाशेजारील रहिवासी जागाही धरणाकरिता संपादित करण्यात आली. त्यावेळी प्रमुख मार्गावरील असणार्या पुलांची उंची व रस्ते वाढवून प्रशस्त असे पूल व रस्ते बांधकाम होणे आवश्यक होते. परंतु तत्कालीन स्थितीत संबंधित कुठल्याच विभागाने या गंभीर विषयावर लक्ष न देता वेळ मारून नेली. परंतु त्याचे परिणाम मात्र नागरिकांना भोगावे लागत आहे. किमान एक कि.मी. पर्यंतचा धाड ते करडी मार्ग केवळ धरणाचे पाण्यामुळे सतत नादुरुस्त राहतो. जागोजागी त्यास खड्डे पडताना दिसतात. कारण रोडच्या लगत धरणाचे पाणी येऊन साचते. गेल्या काही वर्षात या रोडची अनेकदा बांधणी केल्या गेली; परंतु हा मार्ग नेहमीच खराब होतो. सध्या पावसाळी वातावरण असून, धाड ते करडी रोड पूर्णत: खराब झाला असून, यावर रोज अपघात घडत आहेत. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणी दोन्ही मार्गावर प्रशस्त उंचीचे पुलांच्या बांधकामासह रोडच्या बांधकामाची मागणी अनेकदा ग्रामस्थांनी करूनही संबंधित विभाग झोपेत आहे. सदर प्रकाराने या भागातील पूल आणि रस्ते आपत्तीसह जीवघेणे ठरत आहे.
** क्षतिग्रस्त पुलाचे बांधकाम नाही
औरंगाबाद रोडवर गावालगत असलेल्या नाल्यावरील पूल क्षतिग्रस्त झाल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २0१३ जूनमध्ये प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाचे कंत्राट ठेकेदारास दिले. या मार्गावरील असणारी वाहतूक पाहता या ठिकाणी प्रशस्त असा मोठा पूल बांधणे आवश्यक होते. मात्र संबंधित विभागाने घाईत या पुलाचे कंत्राट देऊन वेळ मारून नेली. परंतु तब्बल वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरीही या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. वास्तवात या ठिकाणी रोडच्या दुतर्फा भागात धरणाचे पाणी येऊन साचते. ही बाब लक्षात असूनही बांधकाम खात्याने पुलाच्या होणार्या बांधकामावर मुळीच लक्ष दिले नाही. परिणामी हा पूल असून अडचणीचा ठरला आहे. तर धामणगाव रोडवरील पूल अजूनही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे.