लाचखोर सेतूचालकाला पकडले!
By Admin | Updated: November 4, 2015 02:55 IST2015-11-04T02:55:12+5:302015-11-04T02:55:12+5:30
शेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

लाचखोर सेतूचालकाला पकडले!
शेगाव (जि. बुलडाणा) : येथील सेतू कार्यालयाचा चालक हरिदास देवीदास सरोदे यास तीनशे रुपयांची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सवर्णा येथील राजेश मधुकर पहुरकर याने जातीच्या दाखल्याची फाईल तयार करून घेण्यासाठी सेतू कार्यालयात अर्ज केला होता. ही फाईल तयार करण्यासाठी सेतूचालक हरिदास सरोदे रा.अडसूळ याने पाचशे रुपयांची लाच मागितली. त्याबाबत पहुरकर यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. प्रारंभी तीनशे रुपये व नंतर दोनशे रुपये देण्याचे ठरले होते. पंचासमक्ष हरिदास सरोदेने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. ३ नोव्हेंबर रोजी प्रकरणी सापळा रचून हरिदास सरोदे यास तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या विरोधात शेगाव शहर पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायदयाच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिपर्यंत सुरू होती. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक व्ही.आर. पाटील, नेवरे, गडाख, शेळके, सोळंके, वारुळे, सतीश ढोकणे यांनी सहभाग घेतला. शासकीय लोकसेवकांनी लाच मागितल्यास एसीबीकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.