देऊळघाट येथे उमेदवाराच्या घरावर जमावाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST2021-01-16T04:39:10+5:302021-01-16T04:39:10+5:30
बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका उमेदवाराच्या घरावर १०० ते १५० जमावाने हल्ला करत मारहाण केली, तसेच गाड्यांची ...

देऊळघाट येथे उमेदवाराच्या घरावर जमावाचा हल्ला
बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका उमेदवाराच्या घरावर १०० ते १५० जमावाने हल्ला करत मारहाण केली, तसेच गाड्यांची तोडफोड केली आहे. ही घटना बुलडाणा शहराला लागूनच असलेल्या देऊळघाट येथे १५ जानेवारी राेजी रात्री घडली. या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण असून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
देऊळघाट येथील ग्रामपंचायतची एकूण १७ जागांसाठी शुक्रवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली व शांततेत पार पडली. सायंकाळी मतदान आटोपल्यानंतर एका गटाचे काही उमेदवार व कार्यकर्ते मोमीनपुरा येथे वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार व माजी सरपंच मुश्ताक अहमद यांच्या घरी बसून चर्चा करत होते. त्याच वेळी विरोधी गटातील शंभर ते दीडशे कार्यकर्ता व नातेवाईक हातात लाठ्याकाठ्या घेऊन पोहोचले. त्यांनी मुश्ताक अहमद यांच्या घरावर दगडफेक करत शिवीगाळ केली व हल्ला चढविला. या मारहाणीत सईद खान हा युवक गंभीर जखमी झाला आहे, तसेच हल्लेखोरांनी घराबाहेर उभे असलेल्या तीन दुचाकी व खुर्च्यांचीसुद्धा तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच गावात हजर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार सारंग नवलकर आरसीपीचे जवान व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे, तसेच जखमी सईद खान याला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर गावात एकच धावपळ उडाली होती, तसेच सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने व हॉटेल बंद केली आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.