कोट्यवधीची वसुली ग्राहकांच्या खिशातून
By Admin | Updated: January 22, 2015 00:30 IST2015-01-22T00:30:29+5:302015-01-22T00:30:29+5:30
वीज वितरण कंपनीकडून आर्थिक लूट; वसुली थांबविण्याची मागणी.

कोट्यवधीची वसुली ग्राहकांच्या खिशातून
बुलडाणा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजनिर्मिती आकार, वीज पारेषण आकार आणि इन्टेरीम आकार अशा विविध माध्यमातून वीज ग्राहकांकडून बेकायदेशीर वसुली करण्याचा सपाटा सुरू केला असून, ग्राहकांची होणारी ही आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी लोकआंदोलन न्यासच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीज वितरण कंपनीच्या एका परिपत्रकानुसार आर्थिक वर्ष २0११-१२ आणि २0१२-१३ मध्ये वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कंपनीचा ९३१२ कोटी रुपयांचा महसूल बाकी राहिला आहे.
वीज निर्मितीचे ८८६ कोटी रुपये परिगणना करून वर्गीकरण करणे अद्यापपर्यंत बाकी आहे, तर २0१४-१५ या आर्थिक वर्षात १६१७ कोटी रुपयापर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिरिक्त आकार म्हणून ग्राहकांकडून १९२.५३ कोटी रूपये ट्रान्समेशन चाज्रेसच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही बेकायदेशीर वसुली करून वीज वितरण कंपनी वीज ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकत असून, यापूर्वी अशा प्रकारे वसुली केल्या जात नव्हती. आता प्रत्येक वीज ग्राहकांच्या वीज बिलामध्ये हे अतिरिक्त चाज्रेस लावण्यात आले आहेत, त्यामुळे कंपनीने सुरू केलेली ही अतिरिक्त बेकायदेशीर वसुली त्वरित बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर नीलेश भुतडा, संजय जोशी, अनूप श्रीवास्तव, मनोज चंदन, अमोल रिंढे यांच्या सह्या आहेत.
*बुलडाणा जिल्ह्यात चार कोटींची होणार वसुली
बुलडाणा जिल्ह्यात ४ लाख ७ हजार २00 विद्युत ग्राहक आहेत. सर्वसाधारण वीज ग्राहक १५0 युनिट वीज वापरतो. कंपनीने अशा वीज ग्राहकांच्या वीज बिलात १00 रुपये अतिरिक्त चाज्रेस लावले तर जिल्ह्यातील वीज ग्राहकाकडून ४ कोटी ७0 लाख २१ हजार रुपये नियमबाह्यरीत्या वीज ग्राहकाकडून वसूल करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.