वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचा मदतीसाठी मोर्चा
By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 29, 2023 17:06 IST2023-05-29T17:04:56+5:302023-05-29T17:06:29+5:30
मागण्या मान्य न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर तालुक्यातील शेतकरी बहिष्कार टाकतील, असा इशारा शेतकरी मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचा मदतीसाठी मोर्चा
सिंदखेडराजा : रोहीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा २९ मे रोजी तहसिल कार्यालयात मोर्चा धडकला. मागण्या मान्य न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर तालुक्यातील शेतकरी बहिष्कार टाकतील, असा इशारा शेतकरी मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.
शेत शिवारात रोहिंचा त्रास व त्यावर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, रोहींचा त्रास असलेल्या वनविभागाच्या भागात तार कुंपण करावे, नुकसान पंचनामे त्वरित करावेत, नुकसान भरपाई देता येत नसल्यास कुंपणसाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान द्यावे, बँकेने शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड त्वरित काढावे, आदी मागण्यासाठी शहर व तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयात मोर्चा काढला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये दिलीप चौधरी, अक्षय ठाकरे, कैलास मेहेत्रे, सखाराम चौधरी, शहाजी चौधरी, सिद्धार्थ जाधव, अनिल मेहेत्रे, संदीप मेहेत्रे, दत्ता चौधरी, अनिल जावळे, भिकाजी खार्दे, कैलास येडुबा मेहेत्रे, नरहरी तायडे, गजानन मेहेत्रे, सखाराम बर्डे, संजय तायडे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.