रेशन माफियांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: October 15, 2015 00:41 IST2015-10-15T00:41:31+5:302015-10-15T00:41:31+5:30
मलकापूर पोलिसांची कारवाई ; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.

रेशन माफियांविरुद्ध गुन्हा
मलकापूर (जि. बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील मुक्ताईनगर रोडवर शहर पोलिसांनी जप्तीची कारवाई करून ३00 कट्टे रेशनच्या गहू प्रकरणी अखेर शहर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाजार भावानुसार जवळपास २ लाख ४0 हजार रुपयांचा हा मुद्देमाल आहे. दरम्यान, एकापाठोपाठ तांदूळ आणि गहू जप्त करण्यात येऊन या दोन्ही प्रकरणात जवळपास दहा रेशन माफियाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली. मलकापूर येथील गोदाम व्यवस्थापक किशोर हटकर यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास या प्रकरणात गुन्हा दाखल केला. प्रारंभी एमआयडीसी पोलिसांनीही ३00 क्विंटल तांदुळाचे कट्टे जप्त करीत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. खामगाव येथील शासकीय गोदामात सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदूळ व गहू भरलेले ट्रक मलकापूरच्या शासकीय गोदामात न नेता काळाबाजारात विक्रीस जात असताना पोलीस प्रशासनाच्यावतीने १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री जप्तीची कारवाई करण्यात आली. चिखली रणथम येथे ट्रकमध्ये (एम.पी. 0९ के.ए.८१६६) असलेला सुमारे ३00 कट्टे तांदूळ जप्त करण्याची कार्यवाही एमआयडीसी पोलिसांनी करीत, तालुका पुरवठा अधिकारी हरी कुडके यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावर एम.एच.२८ बी.७00६ क्रमांकाच्या ट्रकासह जप्तीची कार्यवाही करण्यात आलेल्या ३00 कट्टे गहूप्रकरणी गोदाम व्यवस्थापक किशोर हटकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अस्मतखाँ मुस्ताकखाँ (रा.कुलमखेड मलकापूर), संदीप ऊर्फ गुड्डसेठ ओमप्रकाश शर्मा (रा. बालाजी प्लॉट, खामगाव), विष्णूकुमार गोकुलचंद शर्मा (रा. अकोला), सैयद एजाज सैयद निजाम (रा. बारादरी, मलकापूर), म. अतिक शफिकउर रहमान (रा. पारपेठ, मलकापूर) या पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. बाजारभावानुसार या गव्हाची किंमत २ लाख ४0 हजार, तर शासकीय किंमत ही ३0 हजार रुपये आहे. मलकापूर येथे नियोजित स्थळी हा गहू न पोहचवता शासनाची फसवणूक करून काळाबाजारात विक्रीस नेत असताना मौजे कुंड शिवारात आढळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर भोगे हे करीत आहेत. या प्रकरणात दहा रेशन माफियांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.