स्वयंपूर्ण गाव बनविणे ही समृद्ध गाव स्पर्धेची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:08+5:302021-02-05T08:36:08+5:30
धामणगाव बढे : जगाला हेवा वाटावा असे स्वप्नातील स्वयंपूर्ण गाव बनविणे हेच समृद्ध गाव स्पर्धेचे उद्दिष्ट असून, सत्यमेव ...

स्वयंपूर्ण गाव बनविणे ही समृद्ध गाव स्पर्धेची संकल्पना
धामणगाव बढे : जगाला हेवा वाटावा असे स्वप्नातील स्वयंपूर्ण गाव बनविणे हेच समृद्ध गाव स्पर्धेचे उद्दिष्ट असून, सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेचे हे पुढचे पाऊल आहे. सामाजिक कार्यासाठी लोक एकत्र येऊ शकतात हे पानी फाउंडेशनच्या जनआंदोलनातून सिद्ध झाले आहे. ही फक्त सुरुवात असून, खरी लढाई पुढे असल्याचे प्रतिपादन पानी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी केले. मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ग्रामीण भागातून लोकांचे होणारे विस्थापन ही चिंतेची बाब आहे. ते रोखले जावे, ग्रामीण भागातील नागरिकांना चांगले जीवन जगता यावे त्यासाठी खेडी स्वयंपूर्ण होणे काळाची गरज आहे. हाच प्रयत्न समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, माजी सरपंच विमल कदम प्रामुख्याने उपस्थित होते. सत्यजित भटकळ यांनी सिंदखेड येथील विविध कामांची पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांनी गावातील तसेच शिवारातील विकासकामांची माहिती दिली. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी या भागातील भौगोलिक परिस्थिती, पाणी व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. गावकऱ्यांच्या एकीतून झालेल्या कामांची दखल प्रशासन घेत असते. त्यामुळे मी आज सिंदखेड गावात उपस्थित आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक राजेंद्र वैराळकर यांनी केले. सूत्रसंचालन पानी फाउंडेशनचे समन्वयक ब्रह्मदेव गिऱ्हे यांनी केले. यावेळी खान्देशचे समन्वयक सुखदेव भोसले ,विदर्भ समन्वयक सुभाष नानवटे, प्रभाग समन्वयक सचिन बोरसे, तालुका अभियान व्यवस्थापक संदीप जाधव, तांत्रिक प्रशिक्षक सुमीत गाेरले आदी उपस्थित हाेते. यावेळी प्रवीण कदम यांचे सत्यजित भटकळ यांनी काैतुक केले.