विहिरीतील गाळ काढताना क्रेन पडून एक ठार
By Admin | Updated: May 20, 2016 01:56 IST2016-05-20T01:56:33+5:302016-05-20T01:56:33+5:30
मलकापूर तालुक्यातील घटना.

विहिरीतील गाळ काढताना क्रेन पडून एक ठार
मलकापूर (जि. बुलडाणा) : विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीतील गाळ वर आणण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन विहिरीत पडल्याने खाली असलेल्या मजुरांपैकी एक मजूर जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मलकापूर तालुक्यातील मौजे वडोदा येथे १९ रोजी सकाळी ६.३0 वाजेच्या सुमारास घडली.
वडोदा येथील रहिवासी नितीन अमृत देशमुख यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. बुधवारी या विहिरीतील काम आटोपल्यानंतर क्रेन दुसर्या बाजूला बसवून मजूर निघून गेले. वाढत्या तापमानामुळे गुरुवारी सकाळीच काम सुरु करण्यासाठी शशिकांत निंबाजी काटकर (वय २५), क्रेनचालक नितीन अमृत देशमुख (वय ३२) व शे.दाऊद शे.कलंदर (वय ३६) या तिघांनी सकाळीच काम सुरु केले. विहिरीत क्रेनला लटकविलेल्या साबळीमध्ये विहिरीतील गाळ भरुन साबळी वर पाठविली. त्यावेळी ही साबळी काही उंचावर गेल्यानंतर क्रेनसह विहिरीत कोसळली. क्रेन बसविताना क्रेनवर अतिरिक्त वजन ठेवले नसल्यामुळे हा अपघात झाला आहे. या घटनेत शशिकांत काटकर हा तरुण जागीच ठार झाला, तर क्रेनचालक नितीन देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जळगाव खांदेश येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शे.दाऊद शे.कलंदर या जखमी मजुरावर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या घटनेची वार्ता कळताच अँड.हरीश रावळ, संतोष रायपुरे, गजानन ठोसर, विजय गायकवाड, आदींसह गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी मलकापूर येथे हलविले. क्रेन हलगर्जीपणे व निष्काळजीपणे चालविल्यामुळे साबळीसह क्रेन विहिरीत पडून मरणास व जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वडोदा येथील संजय दत्तू काटकर वय ४१ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अप नं. ६५/१६ कलम ३0४ अ, ३३७, ३३८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.