कोविड लसीकरणाचा जिल्ह्यात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST2021-01-17T04:29:52+5:302021-01-17T04:29:52+5:30
बुलडाणा : कोविड या साथरोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोविशिल्ड या लसीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ...

कोविड लसीकरणाचा जिल्ह्यात शुभारंभ
बुलडाणा : कोविड या साथरोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोविशिल्ड या लसीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कोविड लसीकरणाचा आज देशभर शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातही जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत यांच्या हस्ते लसीकरण सत्राचे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्याला काेविशिल्डचे १९ हजार डाेस मिळाले आहेत. पहिल्या दिवशी सहा वाजेपर्यंत ५६५ जणांना लस देण्यात आली.
या लसीकरण मोहीमेचा जिल्ह्यात थाटात शुभारंभ करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदींसह आराेग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
लसीकरण सत्रात पहिली लस बुलडाणा येथील डॉ. सोनाली मुंढे-इलग यांना देण्यात आली. लस घेतल्यानंतरही मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी यावेळी दिली. याप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांची उपस्थिती होती. जिल्ह्यात बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय सोबतच शेगाव, दे. राजा, खामगाव, चिखली व मलकापूर येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
लसीकरणानंतरही घ्यावी लागणार काळजी
जिल्ह्यात काेराेना विषाणूवर लस आली असली तरी काळजी घ्यावी लागणार आहे. पहिला डाेस दिल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डाेस देण्यात येणार आहे. दुसरा डाेस दिल्यानंतर १५ दिवसांनी राेगप्रतिकारशक्ती विकसित हाेणार आहे. यादरम्यान, लस घेतल्यानंतरही वारंवार हात धुणे, मास्क लावणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
पहिल्या दिवशी ४३८ जणांना दिली लस
शुभारंभाच्या दिवशी सहा केंद्रामध्ये ४३८ जणांना लस देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरणाचे उद्घाटन झाल्यानंतर इतर ठिकाणीही नाेंदणी केलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
असे झाले लसीकरण
बुलडाणा ६४
शेगाव ५१
देऊळगाव राजा ८५
खामगाव ९९
चिखली ४७
मलकापूर ९२
लस घेण्यासाठी पुढाकार घ्या
लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास हाेत नाही. काेराेना विषाणूला हरवण्यासठी सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेषत: खासगी डाॅक्टर आणि आराेग्य कर्मचाऱ्यांनी भीती न बाळगता काेविशिल्ड लस घ्यावी, असे आवाहन जिल्ह्यातील पहिली लस घेणाऱ्या डॉ. सोनाली मुंढे-इलग यांनी केले.