टपाली मतमोजणीने होईल सुरुवात
By Admin | Updated: May 14, 2014 23:58 IST2014-05-14T23:55:15+5:302014-05-14T23:58:04+5:30
२४ फेर्यांमध्ये होणार्या मतमोजणीची सुरुवात टपाली मतदानाने होणार आहे.

टपाली मतमोजणीने होईल सुरुवात
टपाली मतमोजणीने होईल सुरुवात बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची वेळ अवघ्या एक दिवसावर आली असून, २४ फेर्यांमध्ये होणार्या या मतमोजणीची सुरुवात टपाली मतदानाने होणार आहे. साधारणपणे सहा तास मतमोजणी सुरू राहणार असून, १५ मे रोजी मतमोजणीची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात तीन हजार मतदान हे टपाली असून, कर्मचार्यांचा कौल कुणाला, हे सर्वात आधी स्पष्ट होणार आहे. मतदारसंघात रिंगणात १६ उमेदवार असल्याने मतमोजणीचा कालावधी वाढणार असला तरी पहिल्या दोन फेर्यांमध्येच निकालाचा कौल स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. एक्झीट पोलमुळे उत्साहात असलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रतापराव जाधव यांच्यासाठी विजयानंतर काय करता येईल, याची आखणी सुरू केली असून, राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते विजयाच्या दाव्यावर ठाम आहेत, त्यामुळे निकालाची उत्कंठा प्रचंड वाढली असून, कोणाच्या पदरात यश मिळते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, आज जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी मतमोजणीच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी चिंतामण जोशी उपस्थित होते. उद्या, १५ मे रोजी मतमोजणीची रंगीत तालीम होणार असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल लावण्यात येणार आहेत. मतमोजणी परिसर हा पुर्णपणे हायटेक केला असून, माध्यम कक्षही सज्ज करण्यात आला आहे. निवडणूक निरीक्षकांसाठीही स्टेज तयार करण्यात आले आहे.