आज होणार वन्यजीवांची गणना
By Admin | Updated: May 13, 2014 22:49 IST2014-05-13T22:38:54+5:302014-05-13T22:49:49+5:30
ज्ञानगंगा अभयारण्यात आज बुधवारपासून बुद्धपौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यजिवांची गणना होणार आहे.

आज होणार वन्यजीवांची गणना
खामगाव: दुर्मीळ वनौषधी, समृद्ध वनसंपदा व शेकडो वन्यजीवांचे आश्रयस्थान असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात आज बुधवारपासून बुद्धपौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यजिवांची गणना होणार आहे. खामगाव, मोताळा, बुलडाणा व चिखली तालुक्याच्या २0५.२१ चौरस किलोमीटर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेले आहे. समृद्ध वनक्षेत्र असलेल्या या अभयारण्यात २१ बीट, ९६ कक्षविभाग, ७ वर्तुळ व २१ नियतक्षेत्रामध्ये ज्ञानगंगा अभयारण्याची विभागणी करण्यात आली आहे. ५0 प्रकारच्या वृक्ष प्रजाती, २३ प्रकारची झुडुपे, २८ प्रकारच्या गवती प्रजाती, ८ प्रकारच्या वेली, २३ प्रकारचे सस्तन प्राणी, ३१ प्रकारचे सरपटणारे प्राणी व १४७ प्रकारचे पक्षी ज्ञानगंगामध्ये आढळतात. हिवाळ्यात धरण परिसरात २२ प्रकारचे स्थलांतरीत पक्षी मोठय़ा संख्येने येतात. ज्ञानगंगा, पलढग, माटरगाव धरण, डिलोरी व बोथा हे प्रकल्प अभयारण्यामध्ये येतात. या प्रकल्पांसह वन्यजीव विभागाच्यावतीने १९ पाणवठे वन्यक्षेत्रामध्ये जागोजागी तयार करुन वन्यजिवांची तहान भागविण्याची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे कृत्रीम पाणवठेही तयार आहेत. दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन्यजीवांची गणना केली जाते. यावर्षीही आज बुधवार, १४ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून तर गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रगणना होणार आहे.