कपाशी उत्पादक शेतकरी मोफत बियाण्यांपासून वंचित!
By Admin | Updated: July 20, 2016 00:36 IST2016-07-20T00:36:14+5:302016-07-20T00:36:14+5:30
मोफत बियाणे वाटपाच्या निर्णयास विलंब झाल्याने केवळ साडेचार हजार पॅकेट बियाण्यांचे वाटप झाले.
_ns.jpg)
कपाशी उत्पादक शेतकरी मोफत बियाण्यांपासून वंचित!
बुलडाणा : दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील कपाशीचे उत्पन्न घेणार्या शेतकर्यांना मोफत बियाणे वाटपाचा निर्णय इंडियन र्मचंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या माध्यमातून शासनाने घेतला खरा; मात्र त्याला विलंब झाल्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी मोफत बियाण्यांच्या लाभापासून वंचित राहिले.
इंडियन र्मचंट कॉर्पोरेशन या कंपनीने शासनाच्या माध्यमातून कपाशी उत्पादक शेतकर्यांना मोफत बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला. याकरिता शेतकर्यांची निवड करण्याकरिता त्यांनी काही अटी घातल्या. यामध्ये ज्या शेतकर्याला दुष्काळाची मदत मिळाली नाही, पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, तसेच पीककर्जही मिळाले नाही, अशाच शेतकर्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात गतवर्षी एक लाख ६१ हजार हेक्टरवर २0 हजार शेतकर्यांनी कपाशीची पेरणी केली होती. या शेतकर्यांना दुष्काळी मदत मिळाली नाही, तसेच त्यांना पीकविमाही मिळाला नाही; मात्र यापैकी बहुतांश शेतकर्यांनी पीककर्ज घेतले असल्यामुळे शासनाने ठरविलेल्या अटीत शेतकरीच बसले नाहीत. त्यामुळे निर्णय बदलण्यात आला.
त्या शेतकर्यांनी अद्याप पेरणी केली नाही व ज्यांच्याकडे कर्ज थकीत आहे, अशा शेतकर्यांची निवड करण्याचे आदेश देण्यात आले; मात्र जिल्हय़ातील शेतकर्यांनी लवकरच पेरणी केल्यामुळे जास्त शेतकर्यांना याचा लाभ मिळू शकला नाही. या शेतकर्यांना मोफत बियाणे वाटप करण्याचा अध्यादेश शासनाने ५ जुलै रोजी काढला. जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या पंधरा तारखेपासूनच पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे शेतकर्यांनी आधीच पेरणी केली होती. जिल्ह्याकरिता कपाशी बियाण्यांचे ११ हजार पॅकेट देण्यात आले होते. त्यापैकी नांदुरा तालुक्यात १५00 पॅकेट, शेगाव तालुक्यात २0 पॅकेटचे वाटप करण्यात आले.
११ हजार पैकी ४५00 पॅकेटचे वाटप
जिल्ह्याकरिता कपाशी बियाण्यांच्या ११ हजार पॅकेट देण्यात आले होते. त्यापैकी ४५00 पॅकेटचे वाटप करण्यात आले. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ३१ हजार हेक्टर कपाशीचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख १0 हजार हेक्टरवर कपाशीचे नियोजन करण्यात आले आहे.