नगरसेवक अपात्रप्रकरणी सुनावणी २१ जूनला
By Admin | Updated: June 8, 2016 02:06 IST2016-06-08T02:06:11+5:302016-06-08T02:06:11+5:30
शेगाव नगर परिषदेच्या १0 नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत होणा-या सुनावणीकडे शहरवासीयांचे लक्ष.

नगरसेवक अपात्रप्रकरणी सुनावणी २१ जूनला
शेगाव (जि. बुलडाणा) : येथील नगर परिषदेच्या १0 नगरसेवकांचे अपात्रतेबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असून, जानेवारी महिन्यापासून या प्रकरणाच्या सुनावणीत केवळ तारखाच सुरू आहेत. काँग्रेसच्या ब गटाच्या सदस्य विद्यमान नगराध्यक्ष शारदा कलोरे, योगीता अग्रवाल, शारदा कलोरे, नगरसेवक किरणबाप्पू देशमुख तसेच आघाडीतून काँग्रेसमध्ये आलेले माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, नगरसेवक रवींद्र रायणे, संदीप काळे, नगरसेविका उषा डाबेराव, ज्योती गणोरकार, रूपाली दिनेश शिंदे या १0 नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र केले आहे; मात्र या सर्व नगरसेवकांनी नागपूर खंडपीठाकडून जिल्हाधिकार्यांच्या निर्णयावर स्थगिती मिळवली आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या अंतिम निर्णयासाठी नागपूर खंडपीठात तारखांवर तारखा सुरू आहेत. महिनाभराच्या उन्हाळी सुटीनंतर न्यायालय पुन्हा ६ जून रोजी सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी कोणतीही सुनावणी न होता पुढील २१ तारीख देण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागतो की नाही, याकडे अपात्र नगरसेवकांसह शहरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे; मात्र निवडणुकीपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागला नाही, तर या अपात्र नगरसेवकांना हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना निवडणूक लढविता येणार की नाही, याची खात्री देता येत नाही.