Coronavirus : बुऱ्हाणपूरहून आलेल्या कोरोना संदिग्ध महिलेचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 13:08 IST2020-05-13T13:07:34+5:302020-05-13T13:08:54+5:30
बुऱ्हाणपूरहून आलेल्या संदिग्ध महिलेचा मृत्यू झाला असून, अहवालाची प्रतीक्षा आहे.

Coronavirus : बुऱ्हाणपूरहून आलेल्या कोरोना संदिग्ध महिलेचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/नांदुरा : नांदुरा येथील एका संदिग्ध वृद्ध महिलेचा खामगाव येथील कोवीड रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले असून जो पर्यंत त्याचा अहवाल येत नाही तो पर्यंत या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकत नाही.
मृत महिला ही ६४ वर्षाची होती. गेल्या काही दिवसापासून ती आजारी होती. ह्रदय विकार, थायरॉईड, श्वसनाचा आजार असे काही गंभीर आजार या महिलेला होते. १२ मे रोजी रात्री तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला प्रथमत: नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथून तिला त्वरित खामगाव येथील कोवीड रुग्णालयात हालविण्यात आले. वास्तविक ज्यावेळी तिला खामगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळीच तिची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनाही तिच्यावर उपचार करण्यास अवघा अर्धातास मिळाला. त्या दरम्यान तिचा स्वबॅ नमुनाही घेण्यात आला. तो अकोला येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
मृत वृद्ध महिलेचे बºहाणपूर माहेर असून गेल्या दीड महिन्यापासून ती बºहाणपूर येथेच होती. तेथेच काही दिवसापासून ती आजारी होती. त्यानंतर परवानगी काढून या महिलेस नांदुरा येथे गेल्या काही दिवसापूर्वी आणण्यात आले होते. दरम्यान या महिलेला तीव्र ताप आला तथा अत्यवस्थ वाटू लागल्याने तिला रुग्णालयात हलवले. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता तिला त्वरित रात्री खामगाव येथील कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नांदुरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून मृत महिलेचा परिवारही मोठा आहे. १२ मे रोजी मध्यरात्री मृत महिलेचा स्वॅब नमुना घेण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मृत महिलेला आधीच गंभीर अजार होते. त्यामुळे नेमका रिपोर्ट काय येतो, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे. मृत महिलेच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल हा प्रसंगी १३ मे रोजी सायंकाळी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रोटोकालप्रमाणे करणार अंत्यविधी
मृत वृद्ध महिलेचा स्वॅब नमुन्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे संदिग्ध रुग्ण म्हणून वैद्यकीय प्रोटोकॉलनुसारच पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वृद्ध महिलेचे पार्थिव हे कोरोना संदर्भात देण्यात आलेल्या दिशानिर्देशानुसार रॅपींग करण्यात आले असून नांदुरा तहसिल व तालुका आरोग्य अधिकाºयांच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नांदुरा येथेच मृत महिलेच्या पार्थिवावर तेथील प्रशासनाच्या सुचनेनुसार अंत्यसंस्कार होतील.
अर्धातास डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न
नांदुरा येथील वृद्ध महिला अत्यवस्थ असताना खामगाव येथील कोवीड रुग्णालयात मंगळारी मध्यरात्री दाखल करण्यात आली होती. एकंदरीत परिस्थिती पाहता तेथील डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न करून या वृद्ध महिलेवर उपाचर केले. मात्र अत्यवस्थ अवस्थेत असल्याने मध्यरात्री या महिलेचा मृत्यू झाला.