Coronavirus in Buldhana : पाच दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 10:20 IST2020-04-20T10:20:13+5:302020-04-20T10:20:18+5:30
शनिवारी आणखी २० जणांचे व रविवारी नऊ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Coronavirus in Buldhana : पाच दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. शनिवारी आणखी २० जणांचे व रविवारी नऊ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण २९७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन दिवसांपूर्वी तीन कोरोना बाधीत रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने परिस्थितीत सुधारणा दिसत असली तरी प्रत्येकाने घरी थांबणे हाच उपाय आहे.
कोरोनाचे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत होते. खबरदारी म्हणून प्रशासनाने लॉकडाउनच्या नियमात वाढ करून त्याची कडक अंमलबाजवणी जिल्ह्यात सुरू केली आहे. १४ मार्च रोजी जिल्ह्यातील ५४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले होते. त्यामध्ये ५० निगेटीव्ह, व चार पॉझिटिव्ह अहवाल आले होते. पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये तीन मलकापूर, तर एक बुलडाणा येथील आहे. तसेच पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ६० वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, ४२ व ५१ वर्षीय पुरूष आहेत. एकाच दिवसात चार पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पाच दिवसात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह तीन रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक असली तरी अजूनही नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सध्या दुचाकी व तीन चाकी वाहानांना बंदी घालण्यात आली आहे.
एकाच दिवसात नऊ अहवाल ‘निगेटिव्ह’
रविवार, १९ एप्रिल रोजी प्राप्त नऊ पैकी नऊ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. शनिवारी सुद्धा २० अहवाल निगेटीव्ह आले होते. सध्या कोरोना बाधीत असलेल्या १७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरूवातीला कोरोना पॉझिटीव्ह आलेलया रुग्णाचा अंतीम तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यावरच त्या रुग्णाला कोरोना मुक्त म्हणून घोषीत केल्या जाते. आतापर्यंत जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची अंतीम तपासणी निगेटिव्ह आलेली आहे.