लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. पण, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील ‘फिव्हर क्लिनिक’च कोरोना स्प्रेडर स्पॉट ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खामगाव तालुक्यासह बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याकरिता ठिकठिकाणी कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. उपजिल्हा सामान्य रुग्णालयातही ‘ फिव्हर क्लिनिक ‘ च्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. कोरोनाची भयावह स्थिती निर्माण झाल्याने तपासणी करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सकाळी १० वाजतापासूनच नागरिक ‘ फिव्हर क्लिनिक ‘ समोर तपासणीकरिता गर्दी करतात. याठिकाणी नोंदणी केल्यानंतर दुसरीकडे तपासणी करावी लागते. या नोंदणी केंद्रावर कोरोनाबाधित, त्याच्या संपर्कातील तसेच ज्यांना लक्षणे आहेत अशांची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करणे आवश्यक आहे. यासोबतच येथे येणाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्याचीही गरज आहे. मात्र, असा कुठलाच प्रकार या ठिकाणी दिसत नाही.
गर्दी कोरोना वाढीस कारणीभूत ठरणारी !गुरूवारी दुपारी १ वाजता दरम्यान येथे चांगलीच गर्दी दिसून आली. सकाळपासून दुपारी १ वाजता पर्यंत अनेक व्यक्ती रांगेत होते. यात काही कोरोनाबाधित, त्यांच्या संपर्कातील तर काही लक्षणे असलेले होते. हे सर्व एकाच ठिकाणी गर्दी करुन असल्याने ही स्थिती कोरोना वाढीस कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत वेगवेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.