मोहेगाव सरपंच निवडणुकीचा वाद, ४५ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST2021-02-13T04:33:47+5:302021-02-13T04:33:47+5:30
दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सौरव रमेश चव्हाण (२१), सुरेश चव्हाण (४२) आणि बळीराम चव्हाण (३३ ...

मोहेगाव सरपंच निवडणुकीचा वाद, ४५ जणांवर गुन्हे दाखल
दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सौरव रमेश चव्हाण (२१), सुरेश चव्हाण (४२) आणि बळीराम चव्हाण (३३ सर्व रा. मोहेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मोहेगाव, खडकी आणि खैरखेड अशी तीन गावे मिळून मोहेगाव गट ग्रामपंचायत आहे. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य हे सहलीवर गेले होते. सरपंच निवडीच्या दिवशी अर्थात ११ फेब्रुवारी रोजी या सदस्यांचे वाहन हे गावात परत येऊन ग्रामपंचायत कार्यालयाकडे जात असताना त्या वाहनावर जमावाने दगडफेक केली होती. त्यात वाहनाच्या काचा फुटल्या होत्या. रोखण्यासाठी गेलेल्या नायक पोलीस कॉन्स्टेबल रमेश अरविंद नरोटे यांनाही जमावाने लोटपाट केली होती. त्यांच्याकडील काठीही हिसकावून घेतली होती. तसेच नवनिर्वाचित सदस्यांच्या वाहनात असलेल्या गोविंदा गुळवे यासही स्थानिक ग्रामस्थांनी मारहाण केली होती. गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता पाहता बोराखेडी पोलिसांनी गावामध्ये धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर येथील सरपंच निवडणूक पार पडली होती. मात्र तणावपूर्ण स्थिती पाहता गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सध्या वातावरण निवळले आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त येथे बोराखेडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांनी ठेवला आहे.
दुसरीकडे या प्रकरणात ११ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणणे तथा गैरकायद्याची मंडळी जमवून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविल्याप्रकरणी ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करत आहे. ११ फेब्रुवारी रोजी येथील परिस्थिती पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनीही गावास भेट देऊन पाहणी केली होती.