राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निवडणुकीत अंतर्गत कलह
By Admin | Updated: April 7, 2015 01:54 IST2015-04-07T01:54:52+5:302015-04-07T01:54:52+5:30
खामगाव शहर व तालुकाध्यक्षपदासाठी चुरस; अनेक जण रिंगणात .

राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निवडणुकीत अंतर्गत कलह
अनिल गवई / खामगाव (जि. बुलडाणा) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका आणि शहर अध्यक्ष निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीत क्रियाशील सभासदांसह पक्षाच्या निष्ठावान पदाधिकार्यांना डावलण्यात आल्याचा आरोप होत असून, या आरोपावरून राष्ट्रवादीत गटबाजीच्या राजकारणाला उधाण आले आहे. खामगाव येथे पार पडलेल्या बैठकीत निमंत्रणाचे मानापमान नाट्य रंगल्याची चर्चा आहे. तसेच पक्षातंर्गत गटबाजीमुळे या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले निरीक्षकही हतबल झाले आहेत. त्याचप्रमाणे क्रियाशील सभासदांनाही या बैठकीत डावलल्याच्या आरोपाची चर्चा राजकीय वतरुळात रंगू लागली आहे. दरम्यान, क्रियाशील सदस्यांचीही या सभेला अनुपस्थिती होती, तर काही प्राथमिक सदस्यांनी क्रियाशील सदस्य म्हणून बैठकीत सहभाग घेतल्यामुळे निरीक्षकांच्या ओळखपरेड दरम्यान, पेच निर्माण झाला होता; मात्र पक्षाचे प्राथमिक सदस्य म्हणून त्यांना बैठकीत स्थान देण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला माजी आमदार नानाभाऊ कोकरे, बाबासाहेब बोबडे, अशोक हटकर, गणेश माने, पुंजाजी टिकार, नरेंद्र पुरोहि त, समाधान मुंडे आदींची उपस्थिती होती.