लाच घेताना कंत्राटी अधिका-यास अटक
By Admin | Updated: February 17, 2015 01:23 IST2015-02-17T01:23:45+5:302015-02-17T01:23:45+5:30
खामगाव पंचायत समितीत कार्यरत कंत्राटी अधिका-यास अटक; शेततळे मंजुरीसाठी घेतले होती १२ हजाराची लाच.

लाच घेताना कंत्राटी अधिका-यास अटक
खामगाव (जि. बुलडाणा) : येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी नीलेश अविनाश जाधव एमआरईजीएस यांना १२ हजारांची लाच स्वीकारताना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
स्थानिक पंचायत समितीमध्ये नीलेश जाधव हे एमआरईजीएस या विभागात कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नीलेश जाधव यांनी देऊळगावमही येथील जीवन सुभाषराव देशमुख यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतात शासकीय योजनेतून शेततळे मंजुरीसाठी १५ हजारांची मागणी केली होती; परंतु जीवन देशमुख यांनी नकार दिला असता तडजोडीनंतर १२ हजारांची मागणी नीलेश जाधव यांनी केली होती. त्यामुळे याबाबतची तक्रार जीवन देशमुख यांनी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. त्यानुसार ठरल्याप्रमाणे नीलेश जाधव यांना १६ फेब्रुवारी रोजी लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास खंडेलवाल उपाहार गृहावर जीवन देशमुख यांच्याकडून १२ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नीलेश जाधव यास रंगेहात पकडले. तसेच लाचेची रक्कम जमा करून त्यांच्याविरुद्ध स्थानिक शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम १३ (१) (ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.