उघड्यावर थुंकणे सुरुच; कारवाईचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 12:20 IST2021-01-13T12:19:55+5:302021-01-13T12:20:04+5:30
Spit in the open आदेशाचे पालन तर सोडाच बेजबाबदार नागरिक सार्वजनिक जागांवर बिनधास्त थुंकताना दिसत आहेत.

उघड्यावर थुंकणे सुरुच; कारवाईचा विसर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शिंकल्याने तसेच थुंकल्याने लाळेतून उडणाऱ्या तुषारांपासून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतो. ही बाब लक्षात घेता कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी व सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना तोंडावर मास्क लावण्याचा आदेश आहे. त्या आदेशाचे पालन तर सोडाच बेजबाबदार नागरिक सार्वजनिक जागांवर बिनधास्त थुंकताना दिसत आहेत.
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर अवघ्या जगातच नागरिकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. बाधित व्यक्ती शिंकल्याने तसेच बोलताना लाळेतील तुषार हवेत उडतात व त्याच्या संपर्कात येणारी व्यक्तीही बाधित होऊ शकते.
यासाठीच तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा कहर कमी झाला असून, बाधितांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाकडूनही पूर्वी होती ती सक्ती शिथिल करण्यात आली आहे. याचा गैरफायदा काही बेजबाबदार नागरिक घेत आहेत.
कित्येक नागरिक सार्वजनिक स्थळी उघड्यावरच सर्रास थुंकताना दिसून येत आहेत. धावत्या गाडीवरून जात असतानाच थुंकणे, गुटखा खाऊन भर रस्त्यावर थुंकणे हे प्रकार खामगाव शहरात अगदी क्षुल्लक झाले आहेत. त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
गुटखा खाणाऱ्यांमुळे सर्वाधिक धोका
दिवसभर तोंडात गुटखा भरून ठेवणारे जागा मिळेल तेथे थुंकतात. हा प्रकार अत्याधिक धोक्याचा असून, अशात एखाद्या बाधितापासून कित्येकांना कोरोना व अन्य संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता आता प्रशासनाने उघड्यावर थुंकणाऱ्यांना दणका देण्याची मागणी होत आहे.