तेरवीचा खर्च टाळून गावासाठी शौचालयाचे बांधकाम!
By Admin | Updated: November 8, 2014 08:42 IST2014-11-07T23:30:58+5:302014-11-08T08:42:34+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील बुरकूल कुटूंबांचा आदर्श निर्णय.

तेरवीचा खर्च टाळून गावासाठी शौचालयाचे बांधकाम!
गजानन गोरे/ बुलडाणा
वाशिम जिल्ह्यातील सायखेडा या गावातील महिलेने शौचालय बांधण्यासाठी मंगळसूत्र मोडल्याच्या घटनेची राज्यभर चर्चा सुरू असतानाच, बुलडाणा जिल्ह्यातील एक कुटुंबाने कर्त्या पुरूषाच्या निधनानंतर, तेरवीचा खर्च टाळून गावासाठी शौचालय बांधण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील ग्राम सावंगी टेकाळे येथील बुरकुल कुटुंबीयांनी तेरवीचा खर्च टाळून गावासाठी शौचालय बांधण्याचा निर्णय केवळ जाहीरच केला नाही, तर प्रत्यक्ष कामालाही प्रारंभ केला आहे.
सावंगी टेकाळे येथील सेवानवृत्त शिक्षक माणिकराव गणपतराव बुरकूल यांचे गत २ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम ५ नोव्हेंबर रोजी सावंगी येथे पार पडला. त्या कार्यक्रमातच त्यांच्या ४ मुलांनी समाजबांधवासमोर, तेरवीचा खर्च टाळून गावासाठी शौचालय बांधण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार त्यांनी गावात चार शौचकुपांचे बांधकाम सुरूही केले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली असून, येत्या आठवडयाभरात हे काम पूर्णत्वास जाईल.
*बुरकूल कुटूंबाने यापूर्वीही घेतला होता पुढाकार!
दिवंगत माणिकराव बुरकुल यांना चार पुत्र असून, त्यापैकी मधुकर व रमेश हे शेती बघतात, सुरेश हे पेशाने शिक्षक आहेत, तर चौथे अनिल हे जालना येथे अभियंता आहेत. माणिकराव बुरकुल यांची सून संगीता अनिल बुरकुल यांनी सावंगी गावाचे सरपंच पदही भुषविले आहे. या कुटूंबांने यापूर्वी २0१0 मध्येही स्व:खर्चातून बुटखेडा येथे पाच, तर याच वर्षी सातेफळ येथे तीन शौचालये निर्माण केली आहेत.