जातीय गणितांची मांडणी
By Admin | Updated: October 12, 2014 00:44 IST2014-10-12T00:44:59+5:302014-10-12T00:44:59+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील चित्र; विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड.

जातीय गणितांची मांडणी
बुलडाणा : युती व आघाडी दुभंगल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत होत आहे. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची संख्या वाढल्याने मतदारसंघातील जातीय गणितांची मांडणी उमेदवारांकडून केली जात आहे. लहानमोठय़ा समाजाच्या संघटनांचा पाठिंबा असल्याचे पत्रक मिळविण्यासाठी उमेदवारांची धडपड वाढली असून प्रत्येक मत आपल्याला कसे मिळेल, याचा प्रयत्न केला जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यात मराठा, मुस्लीम, दलित, माळी, राजपूत, वंजारी, धनगर, लेवा पाटील, बारी, कोळी व आदीवासी अशा लहानमोठय़ा समाजाचे मतदान हे निर्णायक ठरत आले आहे. उमेदवारी देतांनाही याच समाजाच्या उमेदवारांचा विचार राजकीय पक्ष करताना दिसून आले. त्यामुळे आपल्या समाजासोबतच इतर समाजाची एकगठ्ठा म ते आपल्याकडे वळती करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. आपल्या कार्यकर्त्यांंमार्फत विशिष्ट समाजाच्या संघटनांना पाठिंब्याचे पत्र देण्याचा आग्रह दिला जात आहे. त्यामुळे एकाच समाजाच्या संघटनांमधील कार्यकर्ते आपआपल्या सोयीने वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा देताना दिसत आहे. जाती-पातीच्या राजकारणाला मुठमाती द्या असा प्रचार प्रत्येक उमेदवार करीत असला तरी निवडून येण्यासाठी जातीचा आधार घेण्याचाच प्रयत्न सर्वांंचा दिसून येत आहे.
*जाहीरनाम्यात स्वप्नरंजन; आश्वासनांची खैरात
जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकर्यांची स्थिती बिकट आहे. दरवर्षी शेतीमध्ये नुकसान होत आहे. निसर्गाच्या अवकृपेने कधी अतिपाऊस, तर कधी पाऊसच न झाल्याने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. पावसाने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले; आता गाव, वस्ती, तांड्यांमध्ये बरसात होत आहे राजकीय पक्ष व उमेदवारांद्वारा मिळणार्या आश्वासनांच्या पावसाची. वास्तविकतेपासून कोसोदूर भरकटलेल्या या प्रचारात मतदारांसाठी केवळ आश्वासनांची गाजरं व जाहीरनाम्याचं स्वप्नरंजन आहे.