काँग्रेस देणार कार्यकर्त्यांना ऊर्जा!
By Admin | Updated: July 12, 2014 00:14 IST2014-07-12T00:04:07+5:302014-07-12T00:14:25+5:30
राज्यभरात निवासी शिबिर : बुलडाण्यापासून सुरूवात

काँग्रेस देणार कार्यकर्त्यांना ऊर्जा!
बुलडाणा : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस जिल्हाभरात आता प्रशिक्षित कार्यकर्त्यांंची फळी तयार करू लागली आहे. प्रत्येक जिल्ह्यात निवडक कार्यकर्त्यांंशी संवाद साधून, लोकसभेतील पराभवावर मंथन करतानाच, विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे विचार पोहोचविण्याचे काम अशा प्रशिक्षित कार्यकर्त्यांंच्या माध्यमातून राज्यभरात केले जाणार आहे. या निवासी शिबिरांची सुरूवात बुलडाण्यातून होत आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे कॉंग्रेस पक्ष पुरता खचून गेला. यामुळे काँग्रेसने आता विरोधी पक्षाची भूमिका बजावणे सुरू केले आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना, या पराभवातून सावरण्यासाठी कार्यकर्त्यांंना ऊर्जा देण्याचा प्रयत्न निवासी शिबिरांच्या माध्यमातून केला जाणार आहे. काँग्रेस सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती या तीन दिवसांच्या शिबिरात देतानाच, जनतेशी संवाद, सोशल मीडिया, मार्केटींग अशा संदर्भाने मार्गदर्शनही केले जाणार आहे. शिबिरासाठी कार्यकर्त्यांंची निवड करण्याची प्रक्रिया गत महिनाभरापासून सुरू होती. पक्षस्तरावर हे शिबिर गांभिर्याने घेतले जात आहे. हे पक्षांतर्गत शिबिर असून, यामध्ये कार्यकर्त्यांंच्या भावना जाणून घेत त्यांना प्रशिक्षित केले जाईल, तसेच येणार्या निवडणुकीसाठी त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले जाणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी सांगितले.