कर्जमुक्तीसाठी काँग्रेस रस्त्यावर
By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:58+5:302015-07-11T01:38:58+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; सरकार गंभीर नसल्याचा काँग्रेसचा आरोप.

कर्जमुक्तीसाठी काँग्रेस रस्त्यावर
बुलडाणा : शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. दुबार पेरणीसाठी तात्काळ मदत करावी आदी मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे १0 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. स्थानिक जयस्तंभ चौकातील गांधी भवन परिसरातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्याम उमाळकर, ज्येष्ठ नेते संजय राठोड, काँग्रेसच्या प्रदेश सचिव अंजली टापरे, माजी आमदार बाबूराव पाटील, लक्ष्मणराव घुमरे, मनोज कायंदे, श्याम डाबरे, मिनल आंबेकर, जयश्री शेळके, जिल्हा परिषद सभापती सभापती अंकुशराव वाघ, गणेश बस्सी, बलदेवराव चोपडे, रामविजय बुरुंगले, डॉ. पुरूषोत्तम देवकर, सुनील सपकाळ, दीपक रिंढे, राजू काटीकर, महेंद्र बोर्डे यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या कक्षात गेले असता, या ठिकाणी प्रशासनाचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर हे रजेवर असल्याने त्यांचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे आहे. ते सचिवांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी असल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला व त्या दरम्यान आक्रमक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांच्या खुर्चीलाच निवेदन दिले. या बाबीची माहिती मिळताच तत्काळ अप्पर जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कक्षात धाव घेऊन निवेदन स्वीकारले.