भाजपाचे आव्हान काँग्रेसला पेलवेना
By Admin | Updated: August 24, 2014 00:56 IST2014-08-24T00:56:00+5:302014-08-24T00:56:00+5:30
आघाडीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी,मनसेही रिंगणात

भाजपाचे आव्हान काँग्रेसला पेलवेना
मलकापूर: विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा मलकापूर विधानसभा मतदार संघ गेल्या तीन दशकात १९८५ चा अपवाद वगळला तर भाजपाचा गड अशी त्याची ख्याती आहे. २0 वर्षांपासून आमदार असलेले चैनसुख संचेती यावेळी तगड्या स्वरूपात कामाला लागले आहेत. विरोधात अजूनही उमेदवार निश्चित नाही. दिमतीला रावळांची बंडखोरी यावेळीसुद्धा असण्याची चिन्हे आहेत. या पृष्ठभूमीवर लोकसभेत मिळालेल्या घवघवीत यशाने भाजपाचे नैतिक बळ प्रचंड वाढले असून, तो झंझावात मतदारसंघात पदोपदी जाणवतो. गेल्या २0 वर्षांपासून भाजपाचे आव्हान पेलण्यास काँग्रेस असर्मथ ठरत आहे.
मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांची ताकद आपआपल्या परिने दमदार अशीच आहे. अगदी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा इतर निवडणुकांत जो तो शक्तीनिशी निवडणुकीला सामोरे जाताना दिसतो; मात्र विधानसभेत तसे राहत नाही. उशिरा जाहीर होणारी उमेदवारी, नेत्यांमधील असमन्वय व अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे प्रत्येकवेळी निकाल भाजपाच्या पथ्थ्यावर पडल्याचे सर्वश्रृत आहे.
आमदार चैनसुख संचेती त्यांची उमेदवारी भाजपाकडून निश्चित असल्याने दरवेळी ते आधीच कामाला लागतात. तसे यावेळीही भिडले आहेत. मलकापूरसह नांदुरा तालुक्यात त्यांनी कार्यक्रमांचा धडाका उडवून दिला आहे. त्यांना भाराकॉंचे आव्हान असते, आताही आहेच. इथे मात्र उमेदवार निश्चित नाही. शिवचंद्र तायडे, डॉ.अरविंद कोलते, डॉ.उमाताई तायडे, बलदेवराव चोपडे, रमेश खाचणे आदींसह १७ जणांनी आपले अर्ज पक्षाकडे सादर करून उमेदवारीसाठी दावा केला आहे.
यात १७ पैकी कुणा एकाला उमेदवारी मिळणार, यावरच सारी गणिते ठरतात. काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाल्यावर पक्षाच्या पदाधिकार्यांत एकसूत्रता वाटत नाही. विरोधात काम करायचा जणूकाही परवानाच मिळाल्यागत असंतुष्टवागतात. परिणामी, त्याचा लाभ भाजपाला झाल्याचे आजवरचा इतिहास सांगतो.
आमदार संचेती यांच्याकडे निवडणूक जिंकण्याची क्षमता निश्चितपणे आहे; पण ते प्रत्येक निवडणूक हे गांभिर्याने लढतात. नियोजन व जनसंपर्क यामधून आ.संचेती यांनी हा मतदारसंघ बांधला असल्याने प्रत्येक वेळी होणारी बंडखोरी त्याच्या पथ्यावरच पडली आहे.
अँड. हरीश रावळ हे यावेळी पुन्हा निवडणूक लढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुन्हा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नेमक्या याच गणिताची गोळाबेरीज भाजपासाठी जमेची बाजू ठरते.
मागील काळात मलकापूर मतदार संघात वैयक्तिक स्वरुपाच्या अभद्र युत्या फोफावल्या आहेत. मोठमोठे पुढारी ह्यधनश्रीह्ण च्या आसर्याला आहेत. अशा पुढार्यांची संख्या वाढल्याने सर्वच पक्षात सध्या नव्याने समीकरणे मांडावी लागत आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय हा येथील कार्यकर्त्यांना नैतिक बळ देणारा ठरला आहे. त्याचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आ.संचेती करत आहेत.
राष्ट्रवादीने मतदारसंघावर दावा केला असला तरी जागा वाटपाच्या सूत्रात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजपाची लढत काँग्रेससोबतच होईल. काँग्रेसने चांगल्या उमेदवाराला रिंगणात उतरविल्यास मलकापूरची विधानसभा निवडणूक रंजक होऊ शकते.