स्वाइन फ्लूबद्दल संभ्रम कायम
By Admin | Updated: February 14, 2015 01:51 IST2015-02-14T01:51:02+5:302015-02-14T01:51:02+5:30
संग्रामपुरात राजस्थानमधून रूग्ण आल्याचा संशय ; जिल्हा सामान्य रूग्णालय अनभिज्ञ.

स्वाइन फ्लूबद्दल संभ्रम कायम
बुलडाणा : संग्रामपूर येथील एका युवकाला स्वाईन फ्लू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राजस्थान येथील डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये हा युवक स्वाइन फ्लू पॉझीटीव्ह निघाला असला तरी स्थानिक रुग्णालय प्रशासनाने मात्र याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे सदर रुग्णाबाबत शुक्रवारपर्यंंत संभ्रम कायम होता.
संग्रामपूर येथील एक युवक राजस्थानमध्ये शिक्षणासाठी गेलेला आहे. आठवड्यापूर्वी त्याला तापाने ग्रासले होते. त्याने डॉक्टरांकडे इलाज केला; मात्र त्याचा ताप कमी होत नव्हता. ताप येणे, खोकला, घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे त्याला दिसू लागल्याने अखेर डॉक्टरांनी त्याच्या स्वाइन फ्लूच्या तपासण्या केल्या. यामध्ये त्याला एच-१ आणि एन-१ या विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यावरून राजस्थान येथील डॉ.लाल यांनी या युवकास स्वाइन फ्लू पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल दिला आहे. हा रुग्ण राजस्थानवरून संग्रामपूर तालुक्यातील एका खेड्यात परतला असून, याबाबत जिल्हा रूग्णालयात संपर्क न करता बाहेरूनच उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.