वहन मिरवणुकीने वासंतिक नवरात्रौत्सवाची सांगता

By Admin | Updated: April 12, 2017 00:54 IST2017-04-12T00:54:05+5:302017-04-12T00:54:05+5:30

चिखली- नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आदिशक्ती आई रेणुका देवी चरणी लाखो भाविक लीन झाल्याने, चिखली शहरात भाविकांचा जनसागर उसळला होता.

The conclusion of Vastantic Navaratri Chat with the procession | वहन मिरवणुकीने वासंतिक नवरात्रौत्सवाची सांगता

वहन मिरवणुकीने वासंतिक नवरात्रौत्सवाची सांगता

चैत्र यात्रा महोत्सव 

सुधीर चेके पाटील - चिखली
नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आदिशक्ती आई रेणुका देवी चरणी लाखो भाविक लीन झाल्याने, चिखली शहरात भाविकांचा जनसागर उसळला होता. यंदा देवीच्या दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये लक्षणीय वाढ पहावयास मिळाली. त्यामुळे पहाटे ४ वाजेपासून उत्तरात्रीपर्यंत दर्शनासाठी लांबच लांग रांग लागली होती. दर्शनबारीतील भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी संस्थान, पालिका प्रशासन व तालुका प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली होती.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान, भक्तांच्या नवसाला पावणारी, मनोकामना पूर्ण करणारी, ग्रामदेवता, आदिमाय, आदिशक्ती आई रेणुका देवी वासंतीक नवरात्रोत्सवाची सांगता व भव्य यात्रा महोत्सव चैत्र पौर्णिमा ११ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरण साजरा करण्यात आला. या यात्रेचे मुख्य आकर्षण रेणुकादेवीच्या अष्टभुजा प्रतिमेच्या वहन मिरवणूकीस सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुरूवात झाली आहे. ही भव्यदिव्य मिरवणूकीची सांगता तब्बल १८ तासांनंतर बुधवारी दुपारच्या सुमारास नगर परिक्रमेनंतर वहन मिरणुकीची सांगता होणार आहे. दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून आई रेणुका देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होवू नये, यासाठी तालुका प्रशासनासह शहरातील दानशूर भाविक व विविध समाजसेवी संस्थांनी विशेष दक्षता घेतली. श्री रेणुकादेवी संस्थान व श्री बचानंद स्वामी संस्थानच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या वासंतिक नवरात्रोत्सवानिमित्त शहराच्या मध्यस्थानी असलेल्या रेणुका देवी मंदिरात ४ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता घटस्थापनेनंतर उत्सवास सुरूवात झाली होती. ४ ते ११ एप्रिल या उत्सवकाळात दररोज दररोज भजन, आरती, सामुहिक गीतापठण आदी पार पडले. १० एप्रिल रोजी झेंडा मिरवणूक, सायंकाळी गळकरी, वगदी पूजन, भंदे मिरवणूक आणि दीपज्योती मिरवणूक काढण्यात आली होती. तर ११ एप्रिल चैत्र पौर्णिमेला रेणुकादेवीला भल्या पहाटे ४ वाजता नवरात्र उत्थापन व अभिषेक झाल्यानंतर शेलुदवासीयांचे मानाचे पातळ चढविण्यात आले. यानंतर दर्शनबारीत लागलेल्या भाविकांनी अत्यंत मनोभावे देविचे दर्शन घेतले. मंदिरात उत्तररात्रीपर्यंत भाविकांची मोठी रांग लागलेली होती. यात्रेनिमित्त घराघरात पाहुणे मंडळी, नोकरी व व्यवसायानिमित्त परगावी असलेले चाकरमाने नागरीक, लेकी-सुना यांची वर्दळ होती. वगदी प्रदक्षिणेदरम्यान अनेकांनी नवस फेडला. खण, गळकरी वगदी प्रदक्षिणा, नवसपूर्ती झेंडा मिरवणूक, यासह गेल्या तीन दिवसांपासून शहरातील आॅटोरिक्षा, टॅक्सी, बियाणे महामंडळ, बाजार समिती, अडत, हमाल, एस.टी.आगार, वकील संघ तसेच शहरातील विविध पक्ष संघटना, समाजसेवी संस्था, मित्रमंडळे, पतसंस्था आदींच्यावतीने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येवून देविला पातळ अर्पण करण्यात आले. चर्मकार बंधू भगिनींची चित्तथरारक जिव्हा त्रिशुलधारी मिरवणुकीसह नवसपूर्ती परंपरेनुसार यावर्षीही पहावयास मिळाली. या यात्रेचे मुख्य आकर्षण सायंकाळी आई रेणुकादेवीच्या अष्टभुजा प्रतिमेची भव्य वहन मिरवणूक काढण्यात आली. वहन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी सडासंमार्जन करून, रांगोळ्या चितारून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून देवीचे स्वागत केल्यानंतर मनोभावे पूजा करून दर्शनाचा लाभ सर्व जाती-धर्माच्या भाविकांनी घेतला. या मिरवणुकीत विविध ठिकाणांहून आलेले वाजंत्री वृंद, लोकनृत्य, मनोरंजक खेळ, कवायतीचे लेझीम, टीपरी मंडळाचे आर्कषक कार्यक्रम, गोंधळ, वाघ्या-मुरळी, भजनी मंडळ, पारंपारीक डफडे यांचाही समावेश होता.

Web Title: The conclusion of Vastantic Navaratri Chat with the procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.