खडकपूर्णाच्या पाटाचे अर्धवट काम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:08+5:302021-04-26T04:31:08+5:30

चिखली : खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनच्या पाटाचे काम अर्धवट असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण ...

Complete the partial work of the rocky outcrop | खडकपूर्णाच्या पाटाचे अर्धवट काम पूर्ण करा

खडकपूर्णाच्या पाटाचे अर्धवट काम पूर्ण करा

चिखली : खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनच्या पाटाचे काम अर्धवट असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पाटाच्या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत करून द्यावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले आहे.

खडकपूर्णा प्रकल्पाच्या मेरा वितरिका क्रमांक दोनवरील अंत्री खेडेकर, कवठळ, मेरा खुर्द या शिवारांतील खडकपूर्णा विभागाने पाच ते सात वर्षांपासून पाटाचे काम अर्धवट असताना पूर्ण बिल काढले आहे, असा आरोप स्वाभिमानीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, पाटाच्या अर्धवट कामामुळे अंत्री खेडेकर, कवठळ व मेरा खुर्द या शिवारांतील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊनही त्यांना साधा रस्ता उपलब्ध नाही. पाटाच्या एका बाजूला मुरूम टाकून शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित रस्ता करून देणे बंधनकारक असताना, ठेकेदाराने संबंधित कर्मचाऱ्यांना हाताशी धरून फक्त बिल काढून घेतले आहे, असा गंभीर आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे़ या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच सदर रस्त्यावर वर्षभरापासून मुरूम टाकण्याची मागणी होत असताना संबंधित उडवाउडवीची उत्तरे देतात, त्यांच्यावरही कारवाई व्हावी व रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीचे पदाधिकारी व शेतकरी यांनी केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. यावेळी राणा चंदन, शेख रफिक शेख करीम, अमोल मोरे, महेंद्र जाधव, गजानन गवळी, प्रकाश गोरे व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Complete the partial work of the rocky outcrop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.